Assembly Election : ऐन निवडणुकीच्या काळात कोणते निर्णय घ्यावेत आणि कोणते घेऊ नयेत, याचेदेखील भान काँग्रेस नेत्यांना राहिलेले नाही. काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत हे अशाच निर्णयांमुळे अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘द लोकहित’शी संवाद
यासंदर्भात ‘द लोकहित’शी बोलताना राजू कुकडे म्हणाले, ‘संतोषसिंग रावत यांनी जिल्ह्यातील एससी, एसटी व ओबीसीचे आरक्षण संपवून जिल्ह्यातील हजारो उच्चशिक्षित बेरोजगारांचा हक्क हिरावला आहे. बहुतेक राजकीय पुढारी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबासाठी सामान्य जनतेचा विचार करत नाहीत. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. आणि रावत यांनी तेच केले आहे. आम्ही संबंधित यंत्रणेकडे रावत यांच्या तक्रारी केल्या आहेत. लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे.’
नामांकन दाखल केल्यानंतर काढले पत्र
विधानसभा निवडणूक 2024 साठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर होती. रावत यांनी याच दिवशी नामांकन अर्ज दाखल केला. या काळात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होती. याचेही भान रावत यांना राहिले नाही. त्यांनी 30 ऑक्टोबरला एक पत्र काढून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गटसचिव, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक, कार्यालयातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले. हा जो आर्थिक लाभ दिला गेला, तो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी निगडीत आहे. म्हणजेच मतदारांना प्रभावित करणे आहे. हा प्रकार म्हणजे चक्क आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. याची तक्रार राजू कुकडे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे रावत यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
रावतांच्या चुका मुनगंटीवारांच्या पथ्थ्यावर
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जिल्हा सहकारी बँकेत अनेक गैरप्रकार केले. त्याचा थेट फटका त्यांना या निवडणुकीत बसणार आहे आणि भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे, अशी चर्चा जिल्हाभर सुरू आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. मुनगंटीवार मंत्री आहेत. पण त्यांनी फक्त बल्लारपूरच नव्हे पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यात विकासकामे केली. काहीच नाही, तर निवडणुकीच्या काळात मते मागण्यासाठी तरी जनतेच्या हिताचा विचार केला पाहिजे. पण या काळातही संतोषसिंग रावत यांनी गैरप्रकारच केले. त्यामुळे याचा थेट फायदा सुधीर मुनगंटीवार यांनाच होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.