Committee of Ten : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेl. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळविण्यावर काँग्रेसने लक्ष केंदित केले आहे. त्यासाठी महाविकास आघाडीत जागेची वाटाघाटी करण्याकरिता काँग्रेसने १० नेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. राज्य आणि मुंबईतील जागावाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी या समितीमधील नेत्यांवर असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून तिन्ही पक्षांत अनेक ठिकाणी राजी-नाराजी झाली. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक १३ जागा मिळाल्याने विधानसभेत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, अशी काँग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर सर्वच पक्षांना आपल्याला जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा) विधानसभा निवडणुकीत सुमारे 115 ते 125 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर, काँग्रेसनेही 150 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यामुळे जागावाटपामध्ये या दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली होती. मात्र, त्यातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिल्ली पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या समितीची घोषण केली.
ही आहे समिती
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर राज्यस्तरीय समिती जाहीर केली. या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज बंटी पाटील यांचा समावेश आहे. तर, मुंबई प्रदेश समितीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री अस्लम शेख यांचा समावेश आहे. हे सर्व नेते मित्रपक्षांसोबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा करणार आहेत.
या पक्षांचा समावेश
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी या पक्षांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशाने सर्वच मित्र पक्षांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२ जागांवर दावा केला आहे. समाजवादी पार्टीला ३५ जागा हव्या आहेत. याशिवाय अन्य काही छोट्या पक्षांना जागा हव्या आहेत. काँग्रेसला किमान १०० जागा मिळाव्यात, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी वाटाघाटी करताना अधिक जागा पदरात पाडून घेण्याचे या १० जणांच्या समितीसमोर मोठे आव्हान असेल.