Lok Sabha Election : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील जागा वाटप फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर अनेकदा आरोप केले. नंतर विधानसभेत एकत्र येण्याची साद घातली. मात्र, आता आंबेडकर यांनी काँग्रेसचा न्यायाशी संबंध नसल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत न्याय पत्रावरून प्रचार करीत असतानाच त्यांनी रोहित वेमुला प्रकरणावरून टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश अखेर झालाच नाही. जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने वंचितने उमेदवार जाहीर केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी प्रचार सभातून काँग्रेसवर अनेकदा टीका केली. तर दोन दिवसांपूर्वी लातूर येथील सभेत आंबेडकर यांनी काँग्रेसला साद घातली. आंबेडकर म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. सध्या काँग्रेसमध्ये जे होत आहे ते काही बरोबर नाही अशी त्यांची धारणा आहे. विधानसभेत काँग्रेसवाले जर तयार असतील, तर एकत्र आम्ही विधानसभा लढू.
मात्र, आताच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काँग्रेसचे सँडविच होत आहे. काँग्रेस पक्षाला जर सँडविच व्हायचे नसेल तर ते आमची ऑफर नक्कीच स्वीकारतील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकास्त्र!
प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या एक्स सोशल मीडियावर ट्विट करीत काँग्रेसला डिवचले आहे. काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही. रोहित वेमुला हा दलित नव्हता. तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत येते. रोहित वेमुलासाठी काँग्रेसचा न्याय म्हणजे आपली “खरी जातीय ओळख” शोधून काढेल या भीतीने रोहितने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येसाठी ओढले गेलेले कोणतेही तथ्य किंवा परिस्थिती रेकॉर्डवर उपलब्ध नाही. त्याच्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही.
Nana Patole : मैत्री मान्य नाही म्हणून ‘वंचित’ ला काँग्रेसचे आव्हान!..
तपास अधिकाऱ्यांनी राधिका वेमुला हिला विचारले की, तिची जात निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यास इच्छुक आहे का? काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का? रोहितची आई, बहीण आणि भावासाठी हा तुमचा न्याय आहे का? शैक्षणिक संस्थांमध्ये दर मिनिटाला भेदभाव आणि छळ करणाऱ्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा तुमचा न्याय आहे का? हा तुमचा दलितांचा न्याय आहे का? काँग्रेसला माझा सल्ला आहे की न्याय हा शब्द वापरणे बंद करा. जर तुम्हाला त्याचा अर्थ काय हे माहित नसेल तर गोष्ट वेगळी. पण न्याय ही क्षुल्लक संज्ञा नाही! त्यामुळे काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा, असे आंबेडकर म्हणाले.