महाराष्ट्र

Nagpur South : गिरीष पांडव यांना मान्य नाही पराभव!

Girish Pandav : 7 बुथच्या फेर मतमोजणीसाठी केला अर्ज, भरले 3 लाख रुपये

राज्यभर ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. काँग्रेसचे दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव यांनी सात बुथवरील झालेल्या मतदानाची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी करावी, अशा मागणीचा अर्ज केला आहे. यासाठी त्यांनी तीन लाख रुपयेदेखील भरले आहेत. फिजिकली मोठ्या प्रमाणात लोक उभे करून मतदार यादीमध्ये बोगस नाव, बोगस आधार कार्ड तयार करून मतदान झालं असल्याचा गंभीर आरोप पांडव यांनी केला आहे.

गिरीष पांडव यांनी आज (2 डिसेंबर) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या सर्व प्रकारात प्रशासनही सहभागी आहे. ईव्हीएम निकालात प्रचंड घोळ झालेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली होती, ती अशा पद्धतीने वाया जाऊ शकत नाही. आमच्या सर्वसामान्य जनतेला विजयाची खात्री होती. तसे नियोजनबद्ध काम आमच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केलेले आहे. ओबीसीबहुल भागांमध्ये सर्वाधिक बोगस मतदान झाल्याची शंका आहे.

मी माझ्या जनतेवर आणि कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून 7 बूथवरील व्हीव्हीपॅटच्या फेरमोजणीसाठी 3 लाख रुपये भरले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 20 ते 25 हजारांनी मतदारांची संख्या वाढली आहे. माझ्या भागातून पाच ते साडेपाच हजार मतदारांची नोंद केली गेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनही सहभागी होतं, असा गंभीर आरोप पांडव यांनी केला. भाजपच्या माध्यमातून नवीन मतदाराची नोंद झाली, पण त्यात काँग्रेसने टाकलेल्या मतदारांची नावे आली नाहीत. प्रशासनातील लोकांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्य नाही, असंही पांडव म्हणाले.

Maharashtra Politics : येत्या 5 तारखेला देवेंद्र फडणवीसच घेणार मुख्यमंत्रि‍पदाची शपथ !

या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला प्रत्येक बूथनिहाय 100 च्या वर मतदान वाढलेले आहे. त्यामुळे ही मतं कुठेतरी बोगस आहेत. फिजिकली लोक उभे करून, बाहेरून आणलेले बोगस मतदान करण्यात आले. त्यासाठी व्हीव्हीपॅट मोजणीचा अर्ज केला आहे. मतदानाने मशीनवर पडलेल्या मतांची जुळवणी करून आम्ही मागितली आहे. कारण यात नक्कीच घोळ झाला आहे आणि हा घोळ फेर तपासणीत समोर येईल, असे पांडव यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात न्यायालयीन लढा लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सूचना दिल्या आहे. दोन आणि तीन टक्क्यांत निवडणूक निकालाचे पूर्ण चित्र बदलत असताना, सात टक्के मतदान वाढलं आहे. हे वाढलेले मतदान बोगस असल्याचा दावा गिरीष पांडव यांनी केला आहे. सात बुथवरील फेर मतमोजणीनंतरही समाधान न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे पांडव यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!