Congress on Ajmal Kasab & Ujjwal Nikam : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे शहीद झाले होते. या हल्ल्यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेसने हात वर केले आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी हेमंत करकरे यांच्या संबंधित वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका सावरण्याचा प्रयत्न केला.
आम्ही हेमंत करकरे यांचा आदरच करतो. काँग्रेस कायम सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. वडेट्टीवार यांच्या मताशी काँग्रेस सहमत नाही. त्यांनी देखील केवळ पुस्तकातला मुद्दा वाचला आहे, असे चेन्निथला म्हणाले. हेमंत करकरे यांना दहशतवादी अजमल कसाबने गोळ्या घातल्या नाहीत. आरएसएसशी निष्ठा असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या, असा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यावर ऐन निवडणूक काळात वादळ उठल्याने काँग्रेसला आपली बाजू सावरावी लागत आहे. वडेट्टीवार यांच्या मताशी काँग्रेस सहमत नाही. ते त्यांचे वैयक्तिक विधान आहे, असे चेन्निथला म्हणाले.
Lok Sabha Election : राजकीय समीकरण बदलले अन् धनुष्यबाणाच्या जागी कमळ आले
वाद नेमका काय?
वेडेट्टीवार यांनी 26/11 खटल्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील आणि उत्तर-मध्य मुंबईतील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवले. आरोपी पोलिस अधिकाऱ्याला संरक्षण देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी पुरावे लपवले. भाजप एका देशद्रोही व्यक्तीला का संरक्षण देत आहे. अशा व्यक्तीला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी का दिली, असा प्रश्न त्यांनी केला. या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चाने आंदोलन केले. नागपुरातील वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रकरणाने जोर पकडल्यानंतर वडेट्टीवार यांनी वक्तव्याचा खुलासा केला. एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते बोललो. मुश्रीफ हे महाराष्ट्राचे माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी होते, असे वडेट्टीवार म्हणाले.
चौकशी गरजेची
हेमंत करकरे यांच्या निधनासंदर्भात एका पुस्तकाचा दाखला विजय वडेट्टीवार यांनी दिला. हे पुस्तक एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिले आहे. मुश्रीफ हे पोलिस महानिरीक्षक (IG) होते. यासंदर्भात शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या पुस्तकात जर असा दावा असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. संपूर्ण देशाला या प्रकरणातील सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, असे शशी थरूर म्हणाले.