महाराष्ट्र

Lok Sabha Poll : नागपुरातील ‘त्या’ केंद्रावरील मतदान गृहीतच धरणार नाही

Congress : फेरमतदान घेण्याची आमदार विकास ठाकरेंची मागणी

Nagpur News : लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहेत. अशात आता नागपुरात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून एका पोलिंग बुथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे. या केंद्रावर ‘मॉक पोल’ मते क्लिअर न करताच मतदान घेतले गेले. ही माहिती मतदानाच्या तब्बल 35 दिवसानंतर समोर आली आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. या निर्णयाचा फटका कोणाला बसेल याचा नेम नाही.

आता या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. मतदानाच्या अधिकारापासून नागरिकांना वंचित ठेवणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणीही ठाकरे यांनी केली आहे. मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर सकाळी साडेपाच वाजता मॉक पोलिंग (प्रारुप मतदान) घेण्यात येते. त्यानंतर ‘कंट्रोल युनिट’वरील ‘क्लोज रिजल्ट क्लिअर’ (CRC) करुन प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते.

चाचणी केलीच नाही 

नागपूर लोकसभा मतदार संघात मतदान केंद्र क्रमांक 233 आहे. दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर हे ते केंद्र. या केंद्रावर ‘मॉक पोलिंग क्लिअर’ न करताच मतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रावर एकूण 865 मतदान होते. त्यापैकी 315 जणांनी मतदान केल्याचे 17 C फॉर्मनुसार दिसून येत आहे. यातही ‘मॉक पोल’ किती आणि प्रत्यक्ष किती जणांनी मतदान केले हे समजून येत नाही. त्यामुळे गोंधळ उडाला आहे. नागपूर पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा प्रकार वरिष्ठांना कळविला. तोपर्यंत 30 एप्रिल 2024 उजाडली होती. याबाबतची माहिती मतदानाच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल रोजीच समोर येणे गरजेचे होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 15 मे रोजी सर्व उमेदवारांना याबाबत एका पत्राद्वारे कळविल्याचे दिसले.

Cultural Policy : नवे सांस्कृतिक धोरण राज्याला काय देणार? मुनगंटीवार म्हणाले….

ठाकरे यांचा आक्षेप 

मतदानातील या घोळाबाबत 24 मे 2024 रोजी कळले, असे ठाकरे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आजपर्यंतही कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही. यासंदर्भात 24 मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, असे ते म्हणाले. गंभीर बाब म्हणजे 15 मे 2024 रोजीच एक पत्र काढण्यात आले. त्यात मतमोजणीत संबंधित केंद्रावरील मते मोजण्यातच येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले आहे. ‘व्हीव्हीपॅट स्लीप’द्वारे अनिवार्य पडताळणीकरिता निवडता येणाऱ्या पाच केंद्रांमध्येही या केंद्राचे समावेश करता येणार नाही, असेही जाहीर झाले आहे. हे पत्र ठाकरे यांना प्राप्त झालेले नाही. याची माहिती 24 मे रोजी मिळाल्यावर त्यांनी तत्काळ यासंदर्भात तक्रार केली. रविनगरातील त्या केंद्रावर फेरमतदानाची मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आधीच अनेकांची नावे मतदार यादीतून गहाळ झालीत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. दुसरीकडे लोकांनी मतदान केल्यावरही त्यांची मते मोजण्यात येणार नसल्याचे फर्मान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे हा मतदारांचा अपमान आहे. त्यामुळे फेरमतदानाची गरज असल्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!