Criticism By Bunty Shelke : काँग्रेस नेत्यांची योग्य साथ न मिळाल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांनी केला आहे. या पराभवासाठी त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार ठरवले आहे. नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे हस्तक असल्याचा आरोप शेळके यांनी केला. या आरोपानंतर त्यांना काँग्रेसकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यालय असलेल्या देवडिया भवन येथे बैठक घेण्याचा प्रयत्न शेळके यांनी केला. मात्र कार्यालयाला कुलूप लावण्यात आले.
देवडिया भवनला कुलूप लागल्यानंतर बंटी शेळके यांनी रस्त्यावरच सभा घेतली. त्यानंतर आता नागपूर मध्ये नाना पटोले विरुद्ध बंटी शेळके असा सामना रंगणार आहे. प्रदेशाध्यक्षांवरच शेळके यांनी आरोप केल्याने या प्रकरणाला गंभीर स्वरूप आले आहे. राहुल गांधी यांच्या टीममध्ये काम केल्यामुळे माजी नगरसेवक बंटी शेळके यांना आपली ताकद प्रचंड वाढल्याचे वाटत आहे. मात्र नाना पटोले हे देखील शक्ती प्रदर्शनाच्या बाबतीत कमी नाहीत.
राहुल यांचे विश्वासू
सध्याच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी नाना पटोले हे एक आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतांची संख्या भरपूर होती. त्यामुळे नाना पटोले यांचे दिल्लीतील वजन वाढले. विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी शिवसेनेकडून करण्यात आल्या. परंतु काँग्रेसच्या ‘हाय कमांड’ने एकही तक्रार कानावर घेतली नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोले यांचा राजीनामाही काँग्रेसने घेतला नाही. उलट नाना पटोले यांना ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्याची सूचना केली.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटप सुरू असताना नाना पटोले आणि काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्यांमध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारावरून वाद झाला. त्यामुळे या जागेचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यावा लागला. राहुल गांधी यांनी सहाजिकच नाना पटोले यांच्या उमेदवाराला पसंती दिली. त्यामुळे आजच्या घडीला काँग्रेसमध्ये नाना पटोले यांचे वजन बऱ्यापैकी आहे. पक्षांतर्गत विरोधकांना शांत करण्यात नाना पटोले यांना मोठे यश आले आहे. प्रदेश कार्यकारणीत असलेले बहुतांश नेते नाना पटोले यांचे समर्थक आहेत. नाना पटोले समर्थक आमदारांची संख्याही मोठी आहे. अशा परिस्थितीत बंटी शेळके यांच्या बंडाला किती यश येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.