Cross Voting : विधान परिषद निवडुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या पाच आमदांना काँग्रेसने शिक्षा दिली आहे. या आमदारांचे आगामी विधानसभा निवडणुकीतील तिकिट कापण्याचा आदेश काढण्यात आला आहे. आमदार मोहन हंबडे, जितेश अंतापूरकर, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, झिशान बाबा सिद्दीकी, हिरामन खोसकर यांचा यात समावेश आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटीर आमदारांवर कारवाईची मागणी केली होती. तसा अहवालही राज्य काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता.
प्रदेश काँग्रेसने पाठविलेल्या अहवालाच्या आधारावर काँग्रेसने फुटीर आमदारांवर कारवाई होणार असे जाहीर केले होते. अहवालाच्या आधारावर आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या एकाही आमदाराला विधानसभेची उमेदवारी देऊ नका. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी द्या, असे स्पष्ट निर्देश हायकमांडने महाराष्ट्र काँग्रेसला दिले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करून महाविकास आघाडीला या पाच आमदारांना मोठा धक्का दिला होता.
नावे सात, कारवाई पाच जणांवर
काँग्रेसने फुटलेल्या आमदारांची संख्या सात असल्याचे सांगितले होते. मात्र कारवाईत केवळ पाचच आमदारांची नावे पुढे आली आहे. उर्वरित दोन आमदारांचे काय, असा प्रश्न आहे. पाच आमदारांविरुद्ध विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बंडखोरीच्या तयारत असलेल्या अन्य आमदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात ते आठ मते फुटल्याचा आरोप आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासठी पहिल्या पसंतीची 28 मते निश्चित केली होती.
सातव यांना तीन आमदारांनी मतदार केले नाही. त्याऐवजी सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा संशय होता. काँग्रेसने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना सहा मते ठरविली होती. यातील एक मत फुटल्याचे आढळले होते. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासूनच काँग्रेस बंडखोर आमदारांबाबत आक्रमक होती. खास पद्धतीने मतदान करून बंडखोर आमदारांना पकडल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यानुसार कारवाईची मागणी काँग्रेस हायकमांडकडे करण्यात आली होती.
अमरावतीला फटका
कारवाई करण्यात आलेल्या आमदारांमध्ये अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा समावेश आहे. खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत. त्यामुळे आमदार खोडके यांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याचा आरोप होता. अमरावतीच्या काँग्रेसमध्ये वाद आहे. त्यामुळे आपल्याला टार्गेट करण्यात येत असल्याचा बचाव आमदार खोडके यांनी केला होता. मात्र हा युक्तीवाद काँग्रेस हायकमांडने ग्राह्य धरलेला दिसत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार सुलभा खोडके यांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खोडके काँग्रेसमध्येच राहतात की अजितदादांच्या गटात जातात, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.