BJP & Congress : हरीश अलीमचंदानी आणि राजेश मिश्रा यांनी दाखल केलेल्या उमेदवारीमुळं अकोला पश्चिममध्ये चूरस वाढली आहे. अनुक्रमे भाजप आणि काँग्रेसपुढं या दोन्ही नेत्यांनी आव्हान उभं केलं आहे. या दोन्ही नेत्यांना समजाविण्यासाठी भाजप आणि काँग्रेस प्रयत्न करीत आहे. हरीश अलीमचंदानी यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. योग्य वेळी त्यांना योग्य ऑफर मिळेल असं सांगण्यात येत आहे. असाच प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे.
काँग्रेसचे साजिद खान पठाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी देखील अकोला पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. मिश्रा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे खासदार संजय राऊत आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. त्यामुळे मिश्रा यांना ‘मातोश्री’ वरून फोन येण्याचे संकेत आहेत. मात्र हा फोन ‘पिछे हटो’साठी येणार की ‘डटे रहो’साठी हे अद्याप अस्पष्ट आहे.
अशेाक ओळंबे बेदखल
भाजपमधून बंडखोरी करीत डॉ. अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र भाजपकडून डॉ. ओळंबे यांना बेदखल करण्यात आलं आहे. एकाही नेत्यानं अद्याप डॉ. ओळंबे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. अकोला पश्चिममध्ये हरीश अलीमचंदानी, राजेश मिश्रा, डॉ. अशोक ओळंबे, माजी स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांच्या उमेदवारीचा परिणाम भाजपच्याच मतांवर होणार आहे. काँग्रेसचे नेते मदन भरगड, काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले डॉ. झिशान हुसेन, राष्ट्रीय समाज पक्षाचे इमरान बेग, सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे मोहम्मद सोहेल, अपक्ष नकील अहमद खान असे मुस्लिम उमेदवार रिंगणात असले तरी त्यांचा साजिद यांच्या मतांवर किती फरक पडेल हे सर्वांनाच ठाऊक आहे.
मुस्लिम मतांचं गणित ठाऊक असल्यामुळेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे साजिद खान पठाण यांच्या नावावर अडून बसले होते. साजिद यांच्या नावावर ते ठाम होते. त्यामुळे झिशान हुसेन आणि साजिद खान यांच्यातील स्पर्धेत अखेर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही साजिद यांच्याच नावाला पसंती दिली. त्यामुळे काहीही झालं तरी विजय मिळविण्याचं आव्हान साजिद यांच्यापुढं आहे. यासाठी साजिद खान हे सर्वच स्तरातून राजेश मिश्रा यांना समजाविण्याचा प्रयत्न करीत आहे..
राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेसला पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचं पारडं जड होईल, असं सांगण्यात येत आहे. राजेश मिश्रा यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अर्ज दाखल केला आहे. अकोल्यात अनेकांनी दंगलीनंतर मिश्रा यांच्यावर निवडणुकीसाठी दबाव निर्माण केला होता. अकोला पश्चिममधील मोर्णा नदीच्या अलीकडील जुने शहरातून विशेषत: मिश्रा यांच्यावर निवडणुकीसाठी दबाव होता. अशात मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत साजिद यांना पाठिंबा दिल्यास त्यांच्या हिंदुत्ववादी चेहऱ्यावर डाग लागेल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं मिश्रा यांना सगळं काही विचारपूर्वकच करावं लागणार आहे.