राजकीय आखाड्यामध्ये साम दाम दंड भेद वापरले जात असते. याचा प्रत्यय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघांमध्ये येत आहे. महाविकास आघाडीला मिळणारे मतदान विरोधीपक्षाने राजकीय षडयंत्र करून मतदार यादीतून वगळल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळब उडाली आहे.
चिखली मतदारसंघामध्ये सध्या भाजपाच्या श्वेता महाले आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा पराभव केला होता. दरम्यान आता पुन्हा निवडणूक आल्यावर मतदारसंघामध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे. मतदारसंघात हजारो ऑनलाईन अर्ज भरून त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन सादर केले. या निवेदनात मतदारांना मतदानापासून रोखण्याचा प्रकार सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी पोळ, तहसीलदार कोकाटे यांच्याकडे नावे कायम ठेवण्याची मागणी केली आहे. चिखली शहरात हे मतदार २५ ते ३० वर्षांपासून रहात आहेत.
BJP : आशीष देशमुख म्हणतात, ‘आता राजीनामा देणार नाही, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही’
मागील अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे मात्र, अज्ञात व्यक्तींनी त्यांची नावे त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून रद्द करण्यासाठी अर्ज भरला. फॉर्म सात व फॉर्म आठ ऑनलाईन भरले. या संबंधित बीएलओने याची शहानिशा केली आहे. या मतदारांना मतदानापासून रोखण्याचे हे षडयंत्र असल्याचे निवेवदनात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
पुरावेही केले सादर
अज्ञात व्यक्तीने जवळपास 1700 लोकांचे फॉर्म क्रमांक सात भरून मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज भरलेला आहे. मात्र मतदारांनी असे कुठलेही अर्ज दाखल केलेले नाही. फॉर्म सातचा स्क्रीन शॉट आणि अर्जांचा रेफरन्स क्रमांकही तक्रारीत नमूद केला आहे. निवेदन देताना बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंदे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, अतिरुद्दीन काझी कार्याध्यक्ष नीलेश अंजनकर, युवक काँग्रेस अध्यक्ष रिकी काकडे आदी उपिस्थत होते.