राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. हिंगोलीतील वसमत येथे ही सभा झाली. गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर सभेतही असाच गोंधळ झाला होता. उपमुख्यमंत्री व्यासपीठावर पोहोचताच काही मराठा आरक्षण आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. असाच प्रकार हिंगोलीच्या वसमतच्या सभेतही घडला.
हिंगोली येथील वसमतमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुरुवारी (दि. २९) मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. अजित पवारांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक झाले. वसमतमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात गुरुवारी जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली. या निमित्ताने वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय परिसरात सभा आयोजित करण्यात आली. या सभेत भाषणाला आजित पवार उभे राहताच मराठा आंदोलकांनी सभेत गोंधळ घातला. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलकांनी सभेदरम्यान आरडाओरड करून गोंधळ निर्माण केला. या प्रकरणात वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये 14 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता वसमत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांची तारांबळ
मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दाखल झाल्याने पोलिसांचा चांगलाच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांनी मध्यस्ती करत आंदोलकांना सभास्थळापासून बाजूला नेले. आणि आंदोलन थांबवले. या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहोत. परंतु पोलीस बळाचा वापर करून आम्हाला निवेदन देण्यापासून रोखलं जातं, असा आरोप आंदोलकांनी केला.
आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे. मेडिकल आणि नोकऱ्या मराठा समाजातील लोकांना मिळत आहेत. ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी सरकारने समिती पाठवलेली आहे. आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत. भेदभाव आणि दुर्लक्ष करून चालत नाही. मराठा तरूणांनी समजूतीनं घ्यायला पाहिजे. इतिहासावर नजर टाका ना. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. त्यासाठी एकमताने मराठा आरक्षणाचा ठराव केला’, अशी भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली.