Mahayuti 2.0 : मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतचा तिढा कायम असतानाच शिवसेनेच्या अनेक आमदारांनी सहा जणांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे सहा नेते महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होते. या सहा जणांकडे गेल्यावर हे काम करीत नाहीत, अशी तक्रार आमदारांनी केली आहे. याशिवाय या सर्व सहा आमदारांविरोधात भाजपसह त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या देखील मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहे. त्यामुळे यंदाच्या कॅबिनेटमध्ये या सहा नावांचा समावेश होणार नाही, याची शक्यता बळावली आहे.
सर्वाधिक तक्रारी माजी मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्यातील आमदार संजय राठोड यांच्या आहेत. राठोड यांच्या बंगल्यामध्ये केवळ कॉन्ट्रॅक्टर लोकांची रेलचेल सुरू असते. सामान्य माणसाला त्यांच्या बंगल्यात जाण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, असा आरोप अनेकांनी केला आहे. यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यांचे राठोड हे यापूर्वी पालकमंत्री होते. या दोन्ही जिल्ह्यातून राठोड यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे.
उर्वरितांचे काय?
संजय राठोड यांच्यासोबतच तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना देखील मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा देखील पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित केसरकर सातत्याने एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत होते. दिल्लीहून परतल्यानंतर एकनाथ शिंदे थेट आपल्या गावी निघून गेले होते. त्यानंतर ते आजारी पडले. यावेळी दीपक केसरकर त्यांना भेटायला गेले होते. मात्र त्यांना शिंदे यांनी भेट दिली नाही.
Mahayuti 2.0 : स्थळ, काळ, वेळ बदलली; टेकडी गणपतीच्या गावी शपथविधी
दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्या संदर्भात देखील शिवसेनेच्या आमदारांची मोठी नाराजी आहे. हे दोन्ही नेते मंत्री होते त्यावेळी त्यांनी कामे केली नाहीत, असा शिवसेनेच्या आमदारांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात येऊ नये अशी आमदारांची मागणी आहे. आमदारांच्या संख्येच्या आधारावर शिवसेनेला नऊ कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री मिळतील असे सांगितले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे सहाजिकच कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये भाजप वरचढ ठरणार आहे.
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता. परंतु अद्यापही गृह आणि महसूल विभागाच्या तिढ्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मुंबईमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आता कमीच आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी दाट शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यंदा अत्यंत कठोरपणे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. मंत्री पदांचे वाटप करताना कडक निकष पाळण्याचे तीनही पक्षाच्या नेत्यांनी ठरवले आहे.