Preventive Action : उपराजधानी नागपूर शहरात घडणाऱ्या अपघातांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात गडकरी यांनी बैठक घेतल्यानंतर नागपुरातील पोलिस विभागही कामाला लागला आहे. नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शहरातील रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना अल्टीमेटम दिल्यानंतर अनेकजण सुतासारखे सरळ झाले आहेत. मुख्य मार्गावरील खड्डे आणि रस्त्यांच्या कामामुळे अपघात होत असल्याची ओरड होत होती. याची दखल घेत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी कंत्राटदारांना कारवाईचा इशारा दिला.
रस्ते किंवा मेट्रोची कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी खबरदारी घ्यावी असे सक्त निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले. यासाठी त्यांनी कंत्राटदारांची एक मॅरेथॉन बैठकच घेतली. ज्या ठिकाणी कामे सुरू असतील, त्या ठिकाणी कठडे आणि रेडियम लावण्यात यावे अशी सूचना त्यांनी कंत्राटदारांना केली. याशिवाय प्रत्येक कामाच्या ठिकाणी मार्शल नियुक्त करण्याबाबतही त्यांनी कंत्राटदारांना सांगितले. कामाच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येईल अशी समजही पोलिस आयुक्तांनी दिली.
सगळे लागले कामाला
पोलिस विभागाने घेतलेल्या या बैठकीनंतर सर्वच कंत्राटदारांनी गांभीर्याने कामाला सुरुवात केली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची किंवा मेट्रोची कामे सुरू आहेत अशा ठिकाणी दिशादर्शक फलकही उभारण्यात आले आहेत. याशिवाय वाहतूक नियंत्रित करण्यासाठी खासगी मार्शलची मदत घेण्यात येत आहे. नागपुरातील काही छोट्या गल्ल्यांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी नाल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडून आहे. विशेषत: अजनी, बेलतरोडी, प्रताप नगर, धंतोली पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी असा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे येथील कंत्राटदारांकडे का दुर्लक्ष होत आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
काही भागातील प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मात्र त्यानंतरही बांधकामाचे साहित्य रस्त्यांवर पडून होते. पोलिस विभागाने घेतलेल्या बैठकीनंतर काही भागातील साहित्य कंत्राटदारांनी उचलले आहे. मात्र अद्यापही शहरातील बहुतांश भागांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतरही असे साहित्य पडून आहे. त्यामुळे देखील अपघाताचा धोका कायम आहे. अनेक भागातील रस्ते मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळेही अपघाताचा धोका कायम आहे. मात्र त्यावर अद्यापही प्रशासनाने तोडगा काढलेला नाही.
मोहिम शांत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक घेतल्यानंतर नागपूर प्रशासन तातडीने कामाला लागले होते. शहरातील हॉटेल, पब्स आणि रेस्टॉरंटची तपासणी सुरू करण्यात आली होती. अनधिकृत ढाब्यांची देखील तपासणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी जाहीर केले होते. एकाच वेळी सर्व शासकीय विभाग ही कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले होते. मात्र कालांतराने ही मोहिम शांत झाल्याचे दिसत आहे. या मोहिमेसोबतच नागपुरातील प्रत्येक गल्लीबोळातील रस्ते खड्डेमुक्त करणेही गरजेचे झाले आहे.