Assembly Election : अंगावर भगवे वस्त्र, चेहऱ्यावर प्रचंड तेज, मनात हिंदुत्व आणि प्रखर वाणीतून काँग्रेसवर केलेल्या प्रहारामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोल्यात काँग्रेसला धू..धू.. धुतलं. काँग्रेसनं आजपर्यंत श्रीराम आणि श्रीकृष्ण झालेच नाही असा दावा केला. श्रीरामाला अयोध्येत आपल्याच जन्मभूमीपासून वनवासात ठेवलं. आता परिस्थिती बदलली आहे. हिंदू एकत्र आला आहे. आपण सर्वांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हे लक्षात ठेवावं असं आवाहन योगींनी अकोल्यात केलं. महायुतीच्या प्रचारासाठी त्यांनी क्रिकेट क्लब मैदानावर सभा घेतली.
योगी आदित्यनाथ यांनी अकोल्यात सभा घ्यावी अशी अनेक वर्षांपासूनच नागरिकांची मागणी होती. लोकसभा निवडणुकीच्या काळातही मोदी, शाह यांच्यापेक्षा योगी यांची सभा व्हावी अशी अकोलेकरांची तीव्र इच्छा होती. मात्र ही सभा होऊ शकली नव्हती. योगींची प्रखर वाणी ऐकण्याची अकोलेकरांची ही भूक आता शांत झाली आहे. हिंदुत्वाच्या विषयावर योगी नावाच्या तोफेतून काँग्रेसच्या जातीयवादावर धडाधड वार करण्यात आलं. हा देश आपला आहे. सनातन धर्म आपला आहे. त्यानंतरही श्रीराम नवमी आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक होते, असा आरोप योगी यांनी केला.
सुरक्षेसोबत विकास
केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. मोदींच्या सरकारला पाकिस्तान घाबरते. राज्यात महायुतीचं सरकार आल्यास सुरेक्षेसोबत विकासही होईल. सध्या भारतात लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद असं वातावरण सुरू आहे. उत्तर प्रदेशात आधी दंगली व्हायच्या. आता उत्तर प्रदेश शांत करू टाकलं आहे. श्रीराम मंदिराच्या निर्माणानंतर अयोध्येचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रयागराजमध्ये आता कुंभमेळा होणार आहे. अकोल्यातील रामभक्तांना अयोध्या आणि प्रयागराजमध्ये घेऊन यावं, असं आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केलं.
Akola BJP : योगींच्या सभेतून आमदार पिंपळेंचा फोटो गायब कारण..
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात खास करून अकोला पश्चिमचा आवर्जून उल्लेख केला. अकोल्यात विजय अग्रवाल यांना मतदान केलं नाही तर गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक नक्कीच होईल. ‘लॅन्ड जिहाद’ नक्कीच होईल, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. अकोला पश्चिममध्ये एक राहणं नितांत गरजेचं आहे. अकोला पश्चिममध्ये जर हिंदू मतदार विभाजित झाले तर परिणाम धोकादायक होतील. त्यामुळं या धोक्यापासून वाचायचे असेल तर एक व्हावं लागेल असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. योगी आदित्यनाथ यांच्या सभेनंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लोकांमध्ये बऱ्यापैकी हिंदुत्वाचा जोश संचारल्याचं दिसलं. त्यांच्या आवाहनाला अकोला पश्चिममधील मतदार किती साथ देतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.