Umred News : विदर्भातील उन्हाचा तडाखा अच्छा अच्छा यांची लाही लाही करतो अच्छा अच्छांची लाही लाही करतो. अशाच यंदाच्या उन्हाळ्यामध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. विदर्भात सर्वत्र पारा 42 अंश सेल्सिअसवर गेला आहे. प्रचंड चटके लावणाऱ्या उन्हात प्रचार करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. अशाच सातत्याने एसीमध्ये वावरणाऱ्या नेत्यांचा कस विदर्भात प्रचार करताना लागत आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये मायनस तापमान असते. प्रचंड थंडी असणाऱ्या दिल्लीत सतत वावरणारे केंद्रीय नेते सध्या विदर्भात प्रचार करीत आहेत. अशात विदर्भात तापलेल्या उन्हाने या नेत्यांचा घसा कोरडा केला आहे. मात्र चटके लावणाऱ्या उन्हालाही न जुमानता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैदर्भीय चहाची चव चाखली. शरीरातून गळणारा सततचा घाम पुसत मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत भर उन्हात गरमागरम चहाचा आस्वाद घेतला.
रामटेकमधील महायुतीचे उमेदवार आमदार राजू पारवे यांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. या प्रचार फेरीत मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोटारसायकल चालवत राजू पारवेंच्या विजयासाठी मतदारांना साद घातली. या बाईक रॅलीमुळे उमरेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. याच मतदार संघात मुख्यमंत्र्यांनी दोन प्रचार सभाही घेतल्या.
चटक्यांकडे दुर्लक्ष
विदर्भातील कडक उन्हाची पर्वा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार राजू पारवेंसाठी रोड शो केला. बाईक रॅलीला महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. रामटेकला शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. रामटेक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असे सांगत दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राजू पारवे यांना विजयी करायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Lok Sabha Election : मोदींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन
चहाचा मोह
उमरेड मध्ये प्रचार करताना प्रचंड ऊन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजू पारवे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते भर उन्हात बाईकवरून जाताना धामाने ओलेचिंब झाले होते. मात्र उन्हाच्या चटक्यांची पर्वा न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी बाईकवरून प्रवास केला. वाटेत बाईक रॅलीने काही क्षण विश्रांती घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजशिष्टाचार आणि सुरक्षेचे नियम बाजूला ठेवत चहाच्या एका छोट्या दुकानात उन्हामुळे व्याकुळ झालेल्या सामान्य ग्राहकाप्रमाणे पाणी पिले. रॅली थांबल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे कदाचित शीतपेयाचा आनंद घेतील, असेच सर्वांना वाटत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काचेच्या साध्या पेल्यामध्ये गरमागरम चहा घेणे पसंत केले.
आता मुख्यमंत्री चहा घेत असल्यामुळे आमदार राजू पारवे यांनाही तशाच काचेच्या ग्लासमध्ये भर उन्हात गरम चहा घ्यावा लागला. प्रचार रॅलीत असलेल्या अनेकांनी हा क्षण कॅमेरात अचूक टिपला. यावेळी आमदार राजू पारवे यांची थकलेली मुद्रा पाहून रखरखत्या उन्हाळ्यात विदर्भात प्रचार करणे सोपे नाही, याची खात्री सर्वांना पटली.