महाराष्ट्र

Sharad Pawar : फडणवीस म्हणाले, ‘पवार साहेब, पराभव स्वीकारा’

Devendra fadnavis : पवारांच्या गणिताला फडणवीसांचे गणितानेच उत्तर!

Assembly  Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं. यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान महायुतीला मिळालेल्या मतांवर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. यात ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. शरद पवार यांनी देखील महायुतीला मिळालेल्या मतांबाबत शंका उपस्थित केली होती. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट करत लगेच उत्तर दिलं. तसंच लोकसभेतल्या पराभवाचं एक गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि शरद पवारांनी जनतेची दिशाभूल करु नये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पराभवाचे विश्लेषण करताना शरद पवार म्हणाले, “महाविकास आघाडी यापुढील काळातही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पराभव झाला म्हणून नाउमेद व्हायचे नसते. निवडणुकीला काही पर्याय नसतो. मी आयुष्यात 14 वेळा निवडणूक लढलो, मला कधीही पराभव पाहावा लागला नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. जरी पराभव आला तरी चिंता करायची नसते. लोकांमध्ये जावे लागते आणि लोक चिंताग्रस्त आहेत, असे आम्हाला दिसते. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. निवडणूक झाल्यानंतर एक उत्साह दिसतो, तो मात्र यावेळेला दिसत नाही.”

शरद पवारांनी काय गणित मांडलं?

शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला 80 लाख मते पडली आणि त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास 41 आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते 72 लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त 10 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 58 लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत.”

Sharad Pawar : 72 लाख मतं घेणाऱ्यांना 10 जागा अन् 58 लाख मत घेणाऱ्यांना 41 जागा?

ज्येष्ठ नेते आहात, जनतेची दिशाभूल करू नका

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या हँडलवर ट्विट करीत पवारांना प्रश्न विचारले आहेत. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 च्या लोकसभेत काय झाले ते पाहू. भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 जिंकल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे. आपण ज्येष्ठ नेते आहात, जनतेची दिशाभूल करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!