या लेखातील मते लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच, असे नाही.
winter session : लहान मुलं खूप हट्टी असतात. एखादी गोष्ट त्यांना हवी म्हणजे हवीच असते. ती नाही मिळाली तर ते रुसून बसतात. काही वेळेस त्यांची वस्तू कुणी घेतली, तर ते रडगाणे गातात. लहान मुलांचे वागणे आपण समजून घेऊ शकतो. त्यांना फार समज नसते. तथापि समंजस आणि स्वतःला उगाच मोठी समजणारी माणसं जेव्हा उठसूट रडगाणे गातात, तेव्हा मात्र नवल वाटते आणि हसूही येते. अलिकडे शिल्लक राहिलेले विरोधक उगाच आणि अर्थहीन मुद्दे उपस्थित करुन रडगाणे गाताना दिसतात. या अनावश्यक रडून काहूर माजविणा-या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तसेच निवडणूक हरल्याचे वास्तव व्सिकारुन आत्मपरीक्षण करण्याचा मोलाचा सल्लाही दिला.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. झालेला दारुण पराभव आघाडीतील नेत्यांना अजूनही पचवता आलेला नाही. त्यांना निवडणूक निकालात गडबड वाटत आहे. या निकालाचे खापर बहुतेक विरोधक ईव्हीएमवर बिनधास्तपणे फोडताना दिसतात. त्यांचे ईव्हीएमच्या विरोधातील रडगाणे संपता संपत नाही. जनमताचा कौल अमान्य करुन विरोधकांचे वेगळे तर्क मांडण्याचे उद्योग सुरू आहेत. नाहक अफवा पसरविल्या जात आहेत.
चर्चेला उत्तर
विरोधकांच्या या धुर्तकाव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार चिमटे काढून समाचार घेतला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. सत्याचा स्वीकार करा. आत्मचिंतन, तसेच स्वतः चे आत्मपरीक्षण करा. असा मोलाचा सल्लाही दिला. जोपर्यंत तुम्ही आत्मचिंतन करत नाही, तोपर्यंत तुमची अशीच गत होणार असा टोलाही लगावला.
विरोधकांना अजूनही पराभव स्विकारता आणि पचवता आलेला नाही. ते फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. विरोधकांनी फेक नरेटिव्ह फॅक्टरी उभी केली आहे. ती उद्ध्वस्त करायला मी पुन्हा आलो आहे. जे संविधान आपण हातात घेऊन फिरतो, त्याचा विश्वासघात तुम्ही करीत आहात. एक प्रकारे संविधानाने ज्या संस्था निर्माण केल्या आहेत, त्यावर अविश्वास व्यक्त केला जात आहे. स्वायत्त संस्थांविरोधात लोकांमध्ये जनमत तयार करणे, हा राजद्रोह आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. हे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
ईव्हीएम विरोधात रडगाणे..
विरोधक सतत ईव्हीएम विरोधात रडगाणे गातात. जेव्हा ते जिंकतात, तेव्हा तो जनतेचा कौल असतो. पराभव होतो तेव्हा ईव्हीएमवर आरोप केले जातात. आम्हाला जनतेने कौल दिला म्हणून आम्ही विजयी झालो. आजपर्यंत जेष्ठ नेते शरद पवार यांनी ईव्हीएमचा विषय कधी काढला नव्हता. आता तेही या विषयावर वक्तव्ये करीत आहेत. या संदर्भात त्यांनी वेगळाच तर्क मांडला. सत्ताधारी छोटी राज्ये आम्हाला देतात, अन् मोठी राज्ये ते घेतात. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला शरद पवार साहेबांचे आश्चर्य वाटते. काँग्रेसला कर्नाटक राज्यात विजय मिळाला. कर्नाटक छोटे राज्य आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
फायदा मलाच झाला..
गेल्या पाच वर्षांत मला आणि माझ्या कुटुंबियांना टार्गेट करण्यात आले. तो महाराष्ट्रात एक रेकॉर्ड असेल. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत सहा-सात लोक फक्त माझ्यावरच बोलायचे. पण मी त्यांचे आभार मानतो कारण ते बोलत राहिले आणि त्यामुळे माझ्या विषयी जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. त्यांचा फायदा मलाच झाला असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका मुद्यावर स्पष्ट मत नोंदवले. जात जेवढी राजकारण्यांच्या मनात आहे, तेवढी जनतेच्या मनात नाही, असे स्पष्ट अवलोकन त्यांनी नोंदविले.
प्रयत्न विफल
विरोधकांचे पोलरायझेशनचे सारे प्रयत्न विफल झाले आहेत. असे नमूद करीत आपण आधुनिक अभिमन्यू आहोत. मला चक्रव्यूह भेदता, येतो असेही त्यांनी ठणकावून सांगितले. जाहिरनाम्यात सरकारने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील. अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नागपूर येथील अधिवेशनात विरोधी पक्ष फारसा प्रभाव पाडू शकला नाही. काँग्रेस पक्षाला साधा गटनेताही निवडता आलेला नाही. विरोधक तुरळक संख्येने शिल्लक राहिले आहेत. विरोधी पक्षनेते पद मिळवण्याएवढेही संख्याबळ त्यांच्या जवळ नाही, असेही ते म्हणाले.