राहुल नार्वेकर यांनी सोमवारी (दि.9) विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान बॅटिंग केली. नार्वेकर यांचे अभिनंदन करताना दोघांनीही विरोधकांना चिमटा घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चिमटा घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांचे अभिनंदन केले. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची दिवसभर चर्चा सुरू राहिली. ‘विरोधी पक्षाची अवस्था चिंताजनक आहे’, असे विधान करत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.
राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्तापक्षाने अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. त्यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर नार्वेकर यांचे अभिनंदन करताना विरोधकांनाही चिमटा काढला. ते म्हणाले, ‘विरोधी पक्षाने चांगल्या निर्णयांसाठी सरकारचे कौतुक करायचे असते आणि चुकीच्या निर्णयांच्या वेळी विरोध करायचा असतो. पण यंदा विधानसभेत विरोधी पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे. विरोधीपक्षनेता बसविण्यासाठी जेवढे आमदार असायला हवेत, तेवढेही त्यांच्याकडे नाहीत. असं व्हायला नको होतं.’ शिंदेंच्या या विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
जनतेनेच डाव्या बाजुची काळजी घेतली
अडिच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी सुद्धा त्यांच्या अभिनंदनावर सगळ्यांची भाषणं झाली होती. नाना पटोले यांनी नार्वेकरांना ‘डाव्या बाजुची जास्त काळजी घ्या’, असा सल्ला दिला होता. मात्र, निवडणुकीत जनतेनेच डाव्या बाजुची जास्त काळजी घेतली आहे, असा टोला शिंदेंनी लगावला. त्याचवेळी नाना पटोले यांनी नार्वेकरांसाठी त्यावेळी जागा रिकामी करून दिली होती, यासाठी त्यांचे आभार मानतो, अशी मिष्किलीही त्यांनी केली.
Legislative Assembly : ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले नव्हते तरीही नार्वेकर आलेत!
नानाभाऊ तुमच्यामुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांना चिमटा काढला. ते म्हणाले, ‘नानाभाऊ, राहुल नार्वेकर तुमच्या आणि माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. नानाभाऊ तुम्ही वाट मोकळी करून दिली म्हणून राहुल नार्वेकर यांना गेल्यावेळी विधानसभा अध्यक्षपद मिळू शकले होते. त्यामुळे तुमचेही आभार मानले पाहिजे.’
थोरात, चव्हाण गेले; पटोले वाचले!
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. ते गेले, पण नाना पटोले थोडक्यात वाचले.’ लोकसभेत चांगल्या जागा निवडून आल्यामुळे विरोधक बुलेटवर स्वार होऊन सुसाट होते. त्यावेळी ते बुलेटवर होते, त्यांनी बॅलेटची मागणी केली नाही. आता हरल्यावर त्यांना बॅलेट आठवले, अशी टीकाही शिंदे यांनी केली.