महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरला पुन्हा ‘मागास’ जिल्हा ठरवायचे आहे का?

Cabinet Expansion : मुनगंटीवारांना डावलल्यानंतर नागरिकांचा संतप्त सवाल

चंद्रपूर जिल्ह्याला ‘मागास’ अवस्थेतून ‘विकसित’ स्थितीमध्ये आणणारे सुधीर मुनगंटीवार यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आणि संबंध महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून अख्ख्या देशात चर्चा घडवून आणणारे मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा ‘मागास’ ठरविण्याचा अट्टाहास देवेंद्र फडणवीस सरकार का करत आहे, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

सुधीर मुनगंटीवार गेल्या तीस वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे मंत्रिपद आलं तेव्हा तेव्हा त्यांनी जिल्ह्यासाठी विकास खेचून आणला आहे. गेल्या दहा वर्षांत तर दृष्ट लागावी एवढा विकास त्यांनी जिल्ह्यात केला आहे. त्यामुळे आता मागास जिल्हा म्हणून ओळख पुसत असताना पुन्हा चंद्रपूर जिल्ह्याला पाच वर्षे मागे लोटण्याचा जनविरोधी निर्णय का घेतला असावा, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले. स्वतः मुनगंटीवार सातवेळा विजयी झाले आहेत. त्यातील तीनवेळा ते कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. एकीकडे विकासापासून कोसो दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. गेल्या दहा वर्षांत अनेक नवे प्रकल्प सुरू झाले. काही प्रकल्प प्रस्तावित आहेत तर काहींचे काम सुरू झाले आहे.

उद्योगांची पायाभरणी मुनगंटीवारांच्याच पुढाकाराने झाली. अशात मुनगंटीवार मंत्री नसल्याने नवे प्रकल्प कसे येणार? सुरू झालेले प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Sudhir Mungantiwar : दुर्लक्षित विभागांत ‘जान’ फुंकणारे कर्तव्यतत्पर नेते

तर अपरिमित हानी अटळ!

मुनगंटीवार मंत्रिमंडळात नसल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल प्रचंड खचले आहे. कार्यकर्तेच नाही तर या भागातील सर्वसामान्य जनतासुद्धा या निर्णयामुळे नाराज झाली आहे. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट झाले आहे. आजवरच्या एवढ्या निवडणुकांमध्ये त्यांच्याच नेतृत्वात पक्ष लढला आणि विजय खेचून आणला आहे. आताही पुढे जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत.

मुनगंटीवार मंत्रिपदी कायम असते तर आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच त्याचा फायदा झाला असता. मात्र सध्याच्या परिस्थितीत पक्षाचे अपरिमित नुकसान अटळ आहे, अशी भावना जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिक अस्वस्थ झाले आहेत. चंद्रपूरच्या विकासाचे काय होणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!