CM Eknath Shinde : ’ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे वाढत्या घटना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष सूचना केली आहे. दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची कुठलीही हयगय न करता थेट कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर सरकारने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणांबाबत कठोर पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.
विशेषत: रात्रीच्या वेळी तसेच विकेंडच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहन चालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे, असे सक्त निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Police Bharti : सरकारने नाही निसर्गानेच विद्यार्थ्यांचं ऐकलं
मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदूषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
मद्य सेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.