Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज या योजनेवरून दोन-दोन गोष्टी होत असतात. या योजनेचा अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचा वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्रातील काही करंट्या लोकांनी पसरविलेल्या अफवा आहेत, असे म्हणत मंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. सोमवारी (ता. 12) चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लाडक्या बहीणींच्या खात्यात रक्षा बंधनापूर्वी पोहोचतील. १ कोटी २४ लाख अर्ज पात्र होते. एवढ्या खात्यात पैसे पोहोचायला ४८ तास लागतात. १७ ऑगस्टला या योजनेचा शुभारंभ करणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच ठिकाणाहून बटण दाबतील. आणि रक्षा बंधनाच्या दिवशी पाच वाजेपर्यंत खात्यात पैसे पोहोचतील, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेसाठी चंद्रपूर जुल्ह्यात २ लाख ८४ हजा ८५७ अर्ज आले. ९८.८५ टक्के अर्ज पात्र ठरले. त्रुटी असणारे अर्ज फार कमी आहेत. त्याही त्रुट्या दूर करणार आहोत. १५०० रुपये जुलै आणि १५०० रुपये ऑगस्टचे असणार आहेत. एखादा अर्ज मागे जरी पडला तरी काळजी करू नका. त्यांनाही दोन महिन्यांचेच पैसे मिळणार आहेत, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : अटक करण्याचा इशारा दिला, तेव्हा कुठे क्लेम मिळाले !
ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी १४ हजार ७०० कोटींची तरतूद केली. यातून आपल्या जिल्ह्यातील ६९ हजार ७६५ शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. एखाद्या शेतकऱ्याचे नाव यादीतून गहाळ झाले असेल, तर त्याने आमच्याशी संपर्क साधावा.’
त्याच दिवसापासून पैसे मिळतील
३१ ऑगस्टनंतर ही योजना बंद पडणार आहे, अशी अफवा काही नतद्रष्ट, करंटे लोक पसरवत आहेत. पण ही योजना कदापिही बंद पडणार नाही. ज्या दिवशी अर्ज कराल, त्याच दिवसापासून योजना लागू होईल, असे विश्वास मुनगंटीवार यांनी दिला. तीन महिन्यांनी निवडणुका झाल्यावर योजना बंद होईल, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, असाही अपप्रचार विरोधक करत आहेत. योजना बंद होणार नाही हे तर निश्चितच आहे. आणि राहिला तिजोरीचा विषय, तर आम्ही कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणून ४४ हजार कोटी रुपये एका दिवसात देऊ शकतो. मग बहीणींसाठी सरकारकडे पैसे नाहीत, या अपप्रचाराला काय अर्थ उरतो?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तर थेट तक्रार करा
वयोश्री योजनेमध्ये ज्येष्ठांसाठी तीन हजार रुपये वर्षाकाठी देण्यात येतील. महिलांना प्रवासामध्ये सवलत दिली आहे. एसटीच्या प्रवासाचा लाभ घेण्यासाठी कुणी अडवत असेल तर महिलांनी वंदे मातरम् पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
5 लाख 34 हजार 02 घरांवर तिरंगा
हर घर तिरंगा हर मन तिरंगा अंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर, प्रतिष्ठानावर तिरंगा ध्वज फटकावा. ध्वजसंहितेमध्ये आता एक सूट दिली आहे. १३ ऑगस्टला सकाळी ९ वाजता झेंडावंदन कराल. १५ ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी झेंडा उतरवून घेतला पाहिजे. दरम्यान पावसाने भिजला किंवा वाऱ्याने फाटला तर झेंडा उतरवून घेतला पाहिजे. ५ लाख ३४ हजार ०२ घरांवर झेंडे लागले पाहिजे असा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.