Mahavikas Aghadi : बदलापूर आणि राज्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (ता. 24) महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीतील पक्षाकडून बंद यशस्वी करण्यासाठी तयारी केली जात आहे. नेत्यांकडून आवाहनही केले जात आहे. मात्र उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंदची घोषणा करणाऱ्या विरोधकांना सूचक इशारा दिल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बंद वरून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्षय बघायला मिळण्याची शक्यता आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांकडूनही हा बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. या बंदच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
तत्काळ सुनावणी
बंदविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणीदेखील घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. अशाप्रकारे राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी ‘आम्ही कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करु’, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या बंदच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘ही माहिती आताच आम्हाला मिळाली. कोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवल्याची माहिती मिळाली आहे. कोर्टाने याआधी देखील अशाप्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते. दंडही ठोठेवले होते. तरी विरोधी पक्ष बंद करण्याचा आग्रह धरत आहेत. या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच भरडला जातो. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय दिला त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, एवढंच मी सांगू इच्छितो. कोर्टाचा निर्णयाचा आदर, अंमलबजावणी सरकार करेल”, असे शिंदे म्हणाले.
Badlapur Effect : कोर्टाचे ताशेरे; हरविलेल्यांबाबत काय करताय?
मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारला तसं झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Shrad Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून शरद पवारांनी महाविकास आघाडीला बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद कदाचित मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.