Assembly Election : मतदानाचा दिवस लोकशाहीच्या उत्सवाचा दिवस आहे. महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस साजरा होत आहे. महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे न्यायचा आहे. महाराष्ट्राला शक्तीशाली करायचे आहे. देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे. त्यामुळं या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी झालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, मतदान पवित्र कर्तव्य आहे. जबाबदारी आहे. ती प्रत्येक नागरिकानं पार पाडावी. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची आपण विनंती करतो. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकाला मतदान करण्याच आवाहन करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांनी सहकुटुंब ठाण्याच्या कोपरी-पाचापाखाडी भागात मतदानाचा हक्क बजावला.
मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या मतांचा अनादर झाला. ही घटना मतदार विसरलेले नाहीत. त्या घटनेमुळे राज्याची दुर्दशा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीने राज्यभरात राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा जनतेला फायदा होत आहे. त्यामुळे जनतेच्या जीवावर महायुती पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
व्यक्त केले समाधान
गेल्या पाच वर्षात राज्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न झाले. विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न झाले. राज्याचा सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या जीवनात बदत घडवायचा आहे. महाराष्ट्राला शक्तीशाली बनण्यासाठी महायुतीने प्रयत्न केला आहे. या राज्यातील जनता समाधानी आहे. मी स्वत: समाधानी आहे. अडीच वर्षांचा आमचा कार्यकाळ लोकांनी पाहिला. महाराष्ट्रातील जनता भरभरुन विकासाला मतदान करेल. मतदानाचा वाढणारा टक्का लोकशाहीला मजबूत करणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी मतदान करावं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात पुन्हा महायुतीच सरकार बहुमताने येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील श्रीनगर भागात आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. एकनाथ शिंदेंनी कुटुंबीयांसह मतदान केल्यानंतर आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चादेखील केली. जनता महायुती सरकारला भरभरून मतदान करणार असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी सरकारनं नागरिकांसाठी राबवलेल्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा सकारात्मक परिणाम झाल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
चार हजार उमेदवार
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक हातेत आहे. यंदा 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उमेदवारांची संख्या 28 टक्क्यांनी वाढली आहे. 2019 मध्ये ही संख्या 3 हजार 239 होती. या उमेदवारांपैकी 2 हजार 86 उमेदवार अपक्ष आहेत. दीडशेहून अधिक मतदारसंघात बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. बंडखोर उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी टक्केवारीचं गणित बिघडणार आहे.