Shiv Sena : आज आपण जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहोत. बाळासाहेबांमुळे आपण आमदार झालो. त्यांच्याच आशीर्वादाने खासदार झालो. मंत्रीही झालो. आज मुख्यमंत्रीही त्यांच्याच आशीर्वादाने झालो आहे. त्यातून उतराई होऊच शकत नाही. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्यांची सेवा हीच बाळासाहेबांना गुरुदक्षिणा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रविवारी (ता. 21) गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिंदे यांनी आपल्या दोन गुरूंना अभिवादन केले. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे.
शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्मृतिस्थळावर जात बाळासाहेबांना नमन केले. दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी आलो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणूक आली म्हणून काही स्मृतिस्थळावर आलेलो नाही. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील जनतेच्या शुभेच्छांमुळे मुख्यमंत्री झालो. त्यामुळे त्यांना अभिवादन करणे कर्तव्य मानतो, असे शिंदे यावेळी म्हणाले. आपण नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले.
मोकळा श्वास देणार
बाळासाहेब नेहमी सांगायचे इमारतीतील प्रकल्प होतील. परंतु लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून उद्यान हवीत. महायुतीचे (Mahayuti) सरकार हे काम करीत आहे. रेसकोर्सची 120 एकर जमीन यासाठी देण्यात आली आहे. कोस्टल रोडच्या बाजूची दीडशे एकर जमीनही राखीव करण्यात आली आहे. एकूण 300 एकर भूखंडावर मोठे पार्क होणार आहे. सरकार यासाठी प्रयत्न करीत आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, लोकांना नोकऱ्या द्या. त्यासाठी नोकऱ्या देणारे हात तयार करा. महायुती सरकार यासाठी सहा हजार, आठ हजार आणि दहा हजार रुपये तरुणांना देणार आहे. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना त्यांचे हे सरकार राबवित असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
सरकार चांगले काम करीत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विरोधक आम्हाला बदनाम करीत आहेत. एकनाथ शिंदेने कोणतेही काम निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केलेले नाही. आजही करीत नाही. गेल्या अडीच वर्षात किती काम झाले हे जनतेने पाहिले आहे. पूर्वीच्या दोन वर्षात काय झाले, हे देखील जनतेला ठाऊक आहे. जनतेची सेवा आम्ही आधीपासूनच करत आहोत. बाळासाहेब म्हणायचे की, जनतेच्या दारात जा. आम्ही शासन लोकांच्या दारी घेऊन जात आहोत. बाळसाहेबांना हिच खरी गुरूदक्षिणा आहे, असे शिंदे म्हणाले.