लक्ष्मण हाके यांची जी काय भूमिका आहे, ती त्यांनी मांडली असावी. त्यांचं मत वेगळे असू शकतं. शरद पवारांची भूमिका मात्र आम्हाला तशी वाटत नाही. जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला अडविण्यात आला. तेव्हा त्यांना काय लिहून देण्यात आले, ते त्यांनी आधी बघावे. मुख्यमंत्री समाजाला उल्लू बनविण्याचे काम करत आहेत, असा हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
नागपुरात रविवारी (ता. 22) वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकारने त्यांच्या काय मागण्या मान्य केल्या, हे त्यांनी सांगावं. पण येवठं मात्र खरं की, एकनाथ शिंदे समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की, त्यांनी जे काही लिहून दिलं, त्याची पूर्तता करावी. शरद पवार साहेबांच्या संदर्भात मात्र ते विधान मला योग्य वाटत नाही.
मविआची सत्ता येईल
खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅनर्सबद्दल वडेट्टीवार म्हणाले, सगळेच पक्ष आपापले बॅनर लावतात. त्याला कुणी अटकाव करू शकत नाही. पण एवढं मात्र खरं की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. महाविकास आघाडीची सत्ता येणार मुख्यमंत्री कोण होईल, हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि निर्णय घेतील.
शरद पवार गटाची घड्याळ चिन्हाची मागणी योग्य आहे. हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला, त्याला त्यांनी चॅलेंज केलं आहे. सकृत दर्शनी जे सत्य आहे, ते लोकसभा निवडणुकीत आपल्याला दिसलं. जनता कोणाच्या बाजूने आहे, हे लक्षात आलं आहे. त्यामुळे घड्याळ चिन्ह हे जर शरद पवारांना मिळत नसेल तर ते गोठविलं गेलं पाहिजे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
स्वतःची पोळी शिकण्याचा प्रयत्न
नितेश राणे अवास्तव बोलत आहे. भाजपच्या नेत्यांनी जो अजेंडा त्याला दिला आहे, त्यानुसार त्याचे बोलणे सुरू आहे. महायुती निवडणूक हरत आहे. निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून मतांचं पोलरायझेशन करण्यासाठी धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची भाजपची नीती आहे. हेच त्यांच्या मुखातून नितेश राणे बोलत आहेत, असे म्हणत त्यांनी नितेश राणेंचे कान टोचले.
ज्या नितेश राणेंनी काँग्रेसमध्ये असताना आरएसएसवर टीका केली. हे हाफ चड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही. हे जातीवादी आहेत, असे ते म्हणाले होते. मात्र आता सत्तेच्या खुर्चीवर असताना राणे असे वक्तव्य करत असतील. दोन धर्मांत आग लावण्याचे काम करत असतील. तर सरकारने त्याचा बंदोबस्त करावा. शासनाची भूमिका त्यासंदर्भात स्पष्ट होत नाही. याचा अर्थ असा की, भारतीय जनता पक्षाला या राज्यात दंगली घडवायच्या आहेत. हे राज्य अस्थिर करायचं आहे. भांडणं लावायची आहेत. निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे. ही भाजपची सत्तेसाठी असलेली नीती असल्याचा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.