Mumbai : पुणे आणि विदर्भासह कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर आले आहेत. तर काही भागांमध्ये अजूनही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अश्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील पूरस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला ऑनफिल्ड सज्ज राहण्याचे आदेश दिले. तसेच गरज पडल्यास सेनादलाची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अतिवृष्टीमुळे ज्या नागरिकांवर संकट कोसळलं आहे त्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री सध्या निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्लीत आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. पूरपरिस्थिती, पावसाची सद्यस्थिती आणि मदत व बचावकार्यासंदर्भात माहिती घेतली.
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच शुक्रवारी (दि.२६) धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. हे लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहावे, अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.
सुरक्षितस्थळी स्थलांतर करा
लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. धरणांमधून होणारा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पुणे, विदर्भातही पूरस्थिती
अतिवृष्टीमुळे कोल्हापूरसह पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर, नागपूरमध्ये तर गेल्या आठवड्यात पावसाने अक्षरशः हाहाःकार माजवला. प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू आहे. चंद्रपूरमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाची मदत तातडीने देण्याचे आदेश दिले. त्यानुसार पूरग्रस्त गावांमधील नागरिकांना प्राथमिक मदत प्राप्त देखील झाली आहे.