Mahayuti : एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या संधीसाधू रवी राणा यांना जरा समज द्या, असा सल्ला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपला दिला आहे. राणा दाम्पत्याची चमकोगिरी आणि बाष्फळ बडबड यामुळं आता महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील एकाही नेत्याशी राणा दाम्पत्याचं पटत नाही. अलीकडेच राणा यांनी अमरावतीची एक जागा निवडणूक आली नाही, तर फरक पडत नाही असं वक्तव्य केलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राणा यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी अशी स्थिती झाल्यासारखे वागत आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. मी दोन विधानसभा निवडणुकांमध्ये रवी राणांचं समर्थन केलं होतं. पण आता त्यांनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. राणा यांच्याबाबत पवारांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळं त्यांनी एक प्रकारे भाजपलाच सल्ला दिला आहे. भाजपच राणा यांना कडेवर घेऊन बसली आहे, अशी टीका आता अमरावतीतून होत आहे.
मुख्यमंत्रीही नाराज
राणा यांच्या फालतू बडबडीमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपला सुनावलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मी सर्वांना सांगतो महायुती या विधानसभा निवडणुकीत मजबुतीने लढत आहे. युतीत कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. मी राणा परिवाराला सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात. सरकार तुमच्या मागे उभं आहे. तुम्ही सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या उमेदवारांना तुम्ही मदत केली पाहिजे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो. तुम्ही महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. युतीत राहायचं युतीविरोधात काम करायचं हे चालणार नाही. कोणीही हे असं करता कामा नये.’
अमरावती शहरात सुलभा खोडके या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात रवी राणा काम करीत आहेत. सुलभा खोडके यांच्या प्रचाराबाबत प्रश्न विचारल्यावर रवी राणा यांनी विचित्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अमरावतीची एक जागा निवडून आली नाही, तर काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं. त्यावरून आता रवी राणा यांच्यासंदर्भात महायुतीतील नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. रवी राणांनी महायुतीची शिस्त पाळावी, महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला आता सगळेच नेते भाजपला देत आहेत.