या लेखामते लेखकांची आहेत, ‘द लोकहित’ या मतांशी सहमत आहेच, असे नाही.
कुणी कसे वागावे, बोलावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. सार्वजनिक जीवनात वावरताना मात्र काही संकेत आणि नियम पाळणे गरजेचे असते. काही जणांना सोईस्करपणे त्याचा विसर पडतो. त्यामुळे वेगळे वाद आणि संघर्ष निर्माण होतात. मने दुखावली जातात तसेच मनामनांत दूरावाही निर्माण होतो.
संख्येने मोजक्या असलेल्या काही राजकीय नेत्यांची वक्तव्ये महाराष्ट्रातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण प्रदूषित करत आहेत. अशा घातक प्रवृत्तींना आळा घालण्याचा विडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उचलणार आहेत. राजकीय संस्कृती सुधारण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. बेताल बिनबुडाचे वक्तव्य करुन राज्यात वादंग निर्माण करणा-यांना ते कोणता डोज पाजतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे.
वायफळ मुक्ताफळे..
राजकीय क्षेत्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात वेगळीच संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न काही नतद्रष्ट लोकांनी चालवला आहे. राजकीय मतभेदाचे रुपांतर मनभेदात झाले आहे. टोकाच्या वैमनस्यातून एकमेकांमधील द्वेष, मत्सर उफाळून येत आहे. समोरच्याचे खच्चीकरण करण्यासाठी वाट्टेल ते प्रयोग सुरू आहेत. शिव्यांची लाखोली वाहून नसता उच्छाद मांडण्याचे प्रकार नवीन राहिलेले नाहीत. कधी नव्हे इतका भाषेचा दर्जा घसरत चालला आहे. मुक्ताफळे उधळणा-यांची संख्या वाढत आहे. त्यांचे विपरीत परिणाम जनमानसावर होताना दिसतात. हे एक वेगळ्याच प्रकारचे टोळीयुद्ध म्हणावे लागेल.
राजकारणातील सडके आंबे..
निवडणूक प्रचारादरम्यान या भ्रमिष्ट वेड्यांनी आपल्या वक्तव्यांनी कहर माजवला होता. जनतेच्या मनात चुकीच्या गोष्टी पेरुन स्वतः चे राजकीय उखळ पांढरे करण्यासाठीचा हा बनाव होता. वेगळी वातावरण निर्मिती करण्यासाठी या मंडळींनी केलेले कारनामे संतापजनक होते. आंब्याच्या टोपलीत एखादा खराब आंबा राहीला तर तो संपूर्ण आंबे सडवून टाकतो, असाच हा प्रकार म्हणावा लागेल.
राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. तथापि आरोप करताना काही मर्यादा पाळणे आवश्यक ठरते. बेछूट, तथ्यहीन, खोटे आरोप करून काही साध्य होत नसते. त्याला योग्य पुरावे आणि आधार हवा.
Mahavikas Aghadi : ‘आय लव्ह मारकडवाडी’ म्हणत महाविकासच्या नेत्यांची फलकबाजी !
नुसतेच हवेत बार उडविण्यात अर्थ नसतो. खोटं बोल पण रेटून बोल, या आविर्भावात काहीही बकवास करणे, अनुदगार काढणे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. पण याचे भान जनतेचे प्रतिनिधित्व करणारे महाभाग का ठेवत नाहीत याचेच आश्चर्य वाटते. आश्चर्य म्हणजे या जबाबदार व्यक्तींना आपल्या बोलण्याचा वागण्याचा मुळीच पश्चात्ताप होत नाही.
वेसण घालणे गरजेचे
अशा चुकीने वागणा-या व्यक्तींना वेसण घालणे गरजेचे झाले आहे. काही अनिष्ट गोष्टींना आळा घालण्यासाठी आचारसंहिता ठरविली असते. काही नियम आखले जातात. नियम किती पाळले जातात, हा प्रश्नच आहे. केवळ नियमावली तयार करून कुठलाही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आत्मचिंतन करुन वागण्या बोलण्यातील तारतम्य जपले पाहिजे. स्वतः शिस्त लावून घेणे त्यासाठी आवश्यक आहे.
आता यांनीही शपथ घ्यावी
चुकीचे बोलणा-या लोकप्रतिनिधींनी मी वाह्यात, वात्रट, बोलणार नाही. मी अर्वाच्य उर्मट बोलणार नाही, आपल्या तोंडाची गटारगंगा करणार नाही, अशी शपथ घ्यायला हवी. शाळेच्या प्रगती पुस्तकावर विद्यार्थ्यांच्या वागणूकीचा शेरा असतो. तसेच वागणूकीचे पुस्तक लोकप्रतिनिधींसाठी ठेवून त्यांची वागणूक, बोलणे , वर्तन याची नोंद घ्यायला हवी. विधिमंडळात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना जाहीर पणे समज देण्याची पद्धत सुरू करण्यास हरकत नसावी. बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या बाबतीत जोपर्यंत कडक कारवाई सुरू होत नाही, तोपर्यंत ही अवेळी नसता धुमाकूळ घालणारी मंडळी वठणीवर येणार नाही.
शिव्यांची लाखोली वाहणा-या जनप्रतिनिधींना भरघोस दंड ठोठावून त्यांना अद्दल घडवायला हवी. भाषा ही कोणत्याही समाजाच्या सभ्यतेचे लक्षण समजली जाते. सभ्यता आणि सांस्कृतिक वारसा याबाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. काही वाचाळवीर एकमेकांची निर्भर्त्सना करतात, अनुदगार काढतात. अशी वक्तव्ये संवेदनशील जनतेची मने दुखावण्याचे काम करतात. या घातक प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे.
चुकीच्या वागण्या बोलण्याला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदळा ग्रामपंचायतीने एक परिणामकारक उपाय योजला आहे. गावात कोणी शिवी दिली तर त्याला पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येतो. गावाला चांगले वळण लावणारा हा उपक्रम आहे. घरी तसेच शाळेत कसं वागावं , बोलावं यांचे धडे आपण गिरवतो. किमान त्याचा विसर लोकप्रतिनिधींनी पडू देऊ नये.
सकारात्मक यश मिळावे
महाराष्ट्र ही थोर साधुसंत, महापुरुष, समाजसुधारक यांच्या वास्तव्याने पावन झालेली पवित्र भूमी आहे. आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक वारसा आपल्या राज्याला लाभला आहे. वैभवशाली महाराष्ट्र आपल्या सुसंस्कृत आणि आचार विचारांनी ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपल्या पसायदान या आपल्या विश्व प्रार्थनेतून जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. राजे शिवछत्रपतींनी राजा आणि राज्य कसे असावे, याचा आदर्श दाखवून दिला आहे.
समाजसुधारकांनी समाजसुधारणे सोबत सामाजिक ऐक्याचे धडे दिले. समतेचा पुरस्कार केला. प्रेमाची आणि स्नेहाची पखरण केली. ऐक्य आणि बंधुभावाची शिकवण दिली. काही राजकीय मंडळी आपल्या वागण्या बोलण्याने राज्याच्या उज्वल परंपरेला बट्टा लावत आहेत. या बेछूट लोकांना आवर घालून महाराष्ट्राचे वैभव जपणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पूर्ववत व्हावी, यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. त्यांच्या सकारात्मक प्रयत्नांना यश मिळावे, अशी आशा बाळगायला हवी.