Nagpur BJP : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या पुष्पहारांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. फडणवीस यांचे आपले ‘होम टाऊन’ नागपूर शहरात नियोजित असलेले ‘लँडिंग’ लांबले आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करीत असलेल्या फडणवीस यांच्यात यांना ‘वेटिंग’वर राहावे लागणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वाभाविकपणे देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर शहरात भव्यदिव्य स्वागत होणार, हे निश्चित होते. त्यानुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारीला देखील सुरुवात केली होती. गुरुवारी (12 डिसेंबर) फडणवीस नागपुरात येणार होते. मात्र दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बैठक होत आहे. त्यामुळे फडणवीस यांचे नागपूर आगमन पुढे ढकलले गेले.
सगळ्यांना उत्सुकता
दिल्लीतील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (13 डिसेंबर) नागपुरात येतील असे वाटत होते. मात्र दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीमधील तीनही नेत्यांना तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे. मंत्र्यांची नावे ‘फायनल’ होताच राजभवनात शपथविधी सोहळा होऊ शकतो. त्यामुळे शुक्रवारी देखील फडणवीस यांची विमान नागपुरात ‘लँड’ होईल, असे कोणतेही संकेत नाहीत. या सर्व परिस्थितीत 16 डिसेंबर पासून विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. त्याच्या एक दिवस अगोदर देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये येतील, असे दिसत आहे.
फडणवीस नागपुरात आल्यानंतर विमानतळापासून त्यांचे अबूतपूर्व स्वागत करण्याची तयारी नागपूर शहर भाजपने केली आहे. धरमपेठ परिसरातील त्रिकोणी पार्कजवळ फडणवीस यांचे खासगी निवासस्थान आहे. धरमपेठेतून फडणवीस यांची विजयी मिरवणूक देखील नियोजित आहे. त्यामुळे विजयाचा हा उत्सव केव्हा साजरा करायला मिळतो, याची प्रतीक्षा नागपूर भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.
जय्यत तयारी
अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर संपूर्ण सरकार नागपूर शहरात दाखल होते. अधिवेशनापूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाते. चहा पाण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. त्यानंतर सरकारकडून प्रसार माध्यमांची संवाद साधला जातो. त्यामुळे 15 डिसेंबरला फडणवीस या मिरवणुकीसाठी वेळ काढू शकतात की नाही? याबद्दल साशंकता आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूर शहरात त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला होता. नागपूर शहरातून अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली होती. असाच विजयाचा उत्सव पुन्हा साजरा करण्याची तयारी नागपूर शहर भाजपची आहे.
Maharashtra Legislature : नागपुरातील इमारतीचा वेगाने कायापालट
राजकीय घडामोडी
कार्यकर्त्यांची कितीही इच्छा असली तरी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता फडणवीसांना विजयाचा पुष्पहार घालण्याची संधी केव्हा मिळते? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. जोपर्यंत सगळे स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत कदाचित फडणवीस यांचा सत्कार आणि विजयी मिरवणूक नागपूर मध्ये निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशननंतरच भाजपच्या कार्यकर्त्यांना जल्लोष करायला मिळेल, असे दिसत आहे.