Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजुन आठवडा उलटून गेलाय तरी महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी (30 मार्च) मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानावर बैठक झाली. बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदार संघांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक पार पडली आहे.
या बैठकीत अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ठाणे, कल्याण, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चारही मतदारसंघांबाबत शिंदेसेना आग्रही असून, नेमका काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी या बैठकीत झाली असल्याचे विश्वनीय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान नाशिकवरुन अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाही आहे. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट हे तिघेही नाशिकसाठी जोर लाऊन आहेत. अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. शिंदे सेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव पुढे केले आहे. गोडसे यांनी तर मुंबईत दोनदा शक्त्तिप्रदर्शन करत आपली दावेदारी मजबूत केला आहे. शुक्रवारी (29 मार्च) गोडसे यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून आल्यानंतर हनुमानाला साकडे घातले असल्याचे बोलले जात आहे.
भुजबळांचे काय?
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या उमेदवारीबाबत काही महिन्यांपूर्वी दिल्लीत महायुतीची बैठक झाली आणि त्यावेळेपासूनच आपल्याला लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला, असा दावा करून सस्पेंस तयार करून ठेवला आहे. भाजप मात्र ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत असून भाजपचा उमेदवार कोण असेल, हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. या सर्व घडामोडी बघता काही जागांची अदलाबदल करता येते का, याची चाचपणी शिंदे-फडणवीस यांच्याकडून करण्यात येत असल्याने जागावाटपचा तिढा सोडविण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर रात्रीचा दिवस करण्यात येत आहे. शेवटी दिल्लीकडून फाइनल आदेश येणार असल्याचे सूत्र सांगतात.