Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे सर्वाधिक आक्रमक कुणी झालं असेल, तर ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ. शपथविधीचे निमंत्रण मिळाले नाही. त्यानंतर ते आक्रमक झाले आणि उघड उघड पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी भुजबळांची प्रशंसा केली. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या चर्चांना उधाण आले आहे.
छगन भुजबळ काँग्रेसमध्ये दाखल झाल्यास त्यांचे स्वागत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने संतापलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचा विषय आता तापला आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे माजी मंत्री आमदार डॉ.नितीन राऊत यांनी खुलासा केला आहे. भुजबळांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली नाही. पण ते काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार नितीन राऊत यांनी छगन भुजबळ यांच्याबाबतीत सांगितले की, ते काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे. आमदार राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यासारखी व्यक्ती काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना येथे काम करण्यास पूर्ण वाव आहे, असे स्पष्टपणे सांगितले.
जनतेसोबत काम करायला तयार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. भुजबळ हे बहुजनांचे नेते आहेत. आज वेळ आली आहे की धर्मनिरपेक्षतेने चालायचे असेल तर जनतेला सोबत घेऊन काम केले पाहिजे. भुजबळ काँग्रेसमध्ये येत असतील, तर आम्ही त्यांचे नक्कीच स्वागत करू.
नितीन राऊत यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनीही भुजबळांची प्रशंसा केली. ते म्हणाले, छगन भुजबळ हे तळागाळातील नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. ते काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. छगन भुजबळ हे खूप मोठे व्यक्ती आहेत. ते वयाने नव्हे, रस्त्यावरून इथपर्यंत पोहोचलेले नेते आहेत. ओबीसी समाज आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतो. काँग्रेस ही खूप मोठी विचारधारा आहे. जो ही विचारधारा मानेल, त्याचे आम्ही स्वागत करू.