Cabinet : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गजांना डावलण्यात आले. यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात कुठलाही रस नसल्याचेही ते सोमवारी म्हणाले. पण, नाराज भुजबळ अधिवेशनाला दांडी मारत थेट मतदारसंघात दाखल झाले. त्याठिकाणी जनतेशी संवाद साधला. एवढेच नव्हे तर आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही, असा शब्दही दिला. या भूमिकेतून भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेतही मिळत आहेत.
भुजबळांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी देखील भुजबळांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा शब्द दिला. भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आम्ही सदैव आपल्यासोबत असल्याच्या भावनाही यावेळी व्यक्त केल्या. ‘भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ’ अशा घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून सोडला. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात घ्या अशी मागणी उपस्थितांनी केली.
आम्हाला फरक पडत नाही
आपण शून्यातून लढा देऊन विश्व निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू. हा लढा हा मंत्रिपदाचा नसून अस्मितेचा आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. ‘मी अनेक मंत्रिपदांवर काम केलं आहे. गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळापासून मी काम करत आहे. त्यामुळे हा प्रश्न मंत्रिपदाचा नाही. माझा लढा अस्मितेचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, असा एकमूखी निर्णय येवला मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर केला. त्याचवेळी मतदारसंघ सोडून आम्हाला पोरकं करू नका, अशी आर्त सादही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातली. विशेष म्हणजे भुजबळांच्या मंत्रिमंडळात नसल्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. भुजबळ साहेब मंत्री असोत वा नसोत, आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत, असा शब्दही येवला लासलगाव येथील नागरिकांनी बोलून दाखवले.
काम थांबणार नाही
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द मी येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात मला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंघ ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असंही भुजबळ म्हणाले.