Sindkhedaraja : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी राज्यात रान उठवले, ही योजना फसवी असून महिलांच्या खात्यावरील पैसे सरकार परत घेईल, असं सांगितले. पण निवडणूक लागली आणि विरोधकांची भाषा बदलली. महायुती सरकार पंधराशे देतात तर आम्ही तीन हजार देऊ म्हणून विरोधक आता सांगत फिरू लागले आहेत. विरोधक लबाड आहेत, लबाडाच आवतन जेवल्याशिवाय खर नसतं त्यामुळे विरोधकांच्या शब्दावर आता जनता विश्वास ठेवणार नाही, असे वक्तव्य, मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.
संविधान बदलणार
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या प्रचारार्थ सिंदखेड राजा येथे मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी शहरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुजबळ बोलत होते. लाडकी बहीणच काय परंतु राज्यातील कोणतीच, कल्याणकारी योजना बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. आधी योजनेवर टीका आणि आता वाढीव रक्कम देण्याचं आश्वासन दिलं जात आहे. यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये असे सांगतानाच भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाबाबतच्या विरोधकांच्या टीकेला देखील उत्तर दिले. आताही संविधान बदलणार असल्याचे विरोधक सांगत आहेत.
मात्र, ही राज्याची निवडणूक आहे. विधानसभेत संविधान बदलता येते का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. केंद्रातील मोदी सरकार संविधान बदलणारे नाही तर संविधानाचा सन्मान करणारे आहे, अशी पुष्टी त्यांनी जोडली. मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचेवर देखील त्यांनी टीका केली. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून शेतकऱ्यांसह सर्व समाज घटकाला दिलासा देणारे निर्णय हे सरकार घेईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
शेरोशायरीचा अंदाज
सभा छगन भुजबळ यांनी यावेळी सभेदरम्यान शेरो शायरीच्या अंदाजात सभा गाजवली. सभेला माजी खासदार सुखदेव काळे, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी सुरेखा ठाकरे, माजी आमदार तोताराम कायंदे, नंदाताई कायंदे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, विष्णू मेहेत्रे, शंतनु बोंद्रे, गिरिधर पाटील, इरफान अली, संतोष खांडेभराड, प्रकाश गीते, सतीश कायंदे, यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, अॅड. नाझेर काझी यांनी सभेत डॉ. शिंगणे यांच्यावर आरोप करून त्यांच्या स्वतःभोवती असलेले संशयाचे मळभ दूर करण्याचा प्रयन केल्याची चर्चा होती.