Mahayuti : छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवणे आता अजित पवारांसाठीच नव्हे तर संपूर्ण महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. भुजबळांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवेशनात हजेरी लावली. पण त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर थेट टीका सुरू केली. बुधवारी ते नाशिकमधील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित होते. एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना राष्ट्रवादीत चांगली वागणूक मिळाली नाही, त्यामुळे निराश झाल्याचे स्पष्ट सांगितले.
अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा भुजबळही सोबत आले. भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडून भाजसोबत सत्तेत सामील होणे धक्कादायक मानले गेले. पण आता अजित पवारांनीच त्यांना मंत्रिमंडळातून वगळले. छगन भुजबळ यांनी मंत्रीपद न मिळाल्याचे दुःख नाही, पण पक्षात जी वागणूक मिळाली ती क्लेशदायक असल्याची खंत एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.
व्यथा मांडली
समता परिषदेच्या बैठकीत देखील त्यांनी आपली खदखद मांडली. मला मंत्री पदाची कुठलीही हाव नाही. मला पदाची फिकीर नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर देशभरातून लोकांचे मला फोन आणि मेसेजेस येत आहेत. मतदारसंघातील जनताही धक्क्यात आहे. त्यांची मी समजूत काढत आहे. महापुरुषांना देखील समाजात काम करत असताना त्रास सहन करावा लागला आहे. काही लोकांना समतेचे चक्र उलट फिरवायचे आहे. त्यांना माझा विरोध आहे, असेही ते म्हणाले.
‘आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटतात असे नाही. मात्र समाजातील वंचित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. मी मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही. सभागृहात जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सर्वात प्रथम मी पाठिंबा दिला,’ असं भुजबळ म्हणाले.
मला गृहित धरू नका
माझा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. कुठल्याही वंचित घटकावर अन्याय होऊ नये हीच माझी भूमिका आहे. दलित, आदिवासी मागासवर्ग यांनी एकत्र राहायला हवे. ‘एक है तो सेफ हैट असे त्यांनी सांगितले. काही लोक आपल्याबाबत वेगळा विचार करत आहेत. मात्र लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाज घटकांनी महायुती सरकारला बहुमत मिळवून दिलं आहे. त्यामुळे मला गृहीत धरू नका, असेही त्यांनी बजावले.