खामगाव विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सरस्वती विद्या मंदिरात झाली. मतमोजणीची प्रक्रियेला सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. दिवसभर झालेली मतमोजणी अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. दरम्यान, मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. प्रत्येक व्यक्तीला तीनदा विचारणा.. दोनदा तपासणी असे एकूण पाचवेळा प्रत्येकाची पडताळणी करूनच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात आला.
15 टेबलवर 24 फेऱ्यांतून मतांची तपासणी पूर्ण झाली. मतमोजणीसाठी 200 हून अधिक अधिकारी व कर्मचारी निवडणूक कार्यालयाने तैनात केले होते. शिवाय पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात केला होता. जागोजागी पोलिसांचा फौजफाटा दिसून येत होता. मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. शिवाय शाळा परिसरातही अधिकचा बंदोबस्त होता. याचसोबत मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून निवडणूक कार्यालयाने वॉच ठेवला होता. सकाळच्या सत्रात उमेदवारांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी दिसून येत होती. दुपारनंतर गर्दी कमी झाली अन् परत सायंकाळी गर्दी वाढल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घेतला आढावा
मतमोजणी केंद्र परिसरातील बंदोबस्त, सुरक्षा अन् कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी शनिवारी मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
वरिष्ठ पोलिस अधिकारी केंद्रावर ठाण मांडून
मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतमोजणीस कोणताही व्यत्यय येऊ नये, वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलिसांनी त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, दिवसभर पविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, पोलिस निरीक्षक पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते.
स्पीकरवरून निकाल ऐकण्याची परंपरा संपली
पूर्वीच्या काळी प्रत्येक निवडणुकीत मतमोजणी ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर समर्थक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असे. मात्र, आता मिनिटा मिनिटाला मोबाईलवर मिळत असलेल्या अपडेट्समुळे स्पीकरवरून मतमोजणी केंद्राबाहेर निकाल ऐकण्याचे कार्यकर्त्यांचे दिवस संपल्याचे चित्र आज दिसून आले.