महाराष्ट्र

Assembly Elections : चरण वाघमारे यांच्या एन्ट्रीने कुणाचे नुकसान?

Bhandara : महाविकास आघाडीत बिघाडी; महायुतीचा मार्ग सोपा?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघ गेल्या काही तासांपासून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघात एका नेत्याने शरद पवारांचे घड्याळ हाताला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडीचे चित्र आहे. तर महायुतीला आपला मार्ग सुकर झाल्यासारखे वाटत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

तुमसरमध्ये सध्या अजित पवार गटाचे राजू कारेमोरे विद्यमान आमदार आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. यापूर्वी त्यांनी चरण वाघमारे यांना 2019 मध्ये पराभवाची धुळ चारलेली आहे. दरम्यान 2014 मध्ये भाजपच्या झेंड्यावर चरण वाघमारे निवडून आले होते. पण त्यानंतर त्यांचे भाजपमधील नेत्यांसोबत चांगलेच खटकले. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत त्यांनी बंड केले. या बंडाचा परिणाम भाजपला भोगावा लागला होता. राजू कारेमोरे विजयी झाले. पण टॉपला असलेल्या भाजपला वाघमारेंच्या बंडामुळे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुढे त्यांनी बीआरएसची कास धरली. आता नव्याने उभारी घेण्याची आशा त्यांना वाटू लागली होती. तर तिकडे तेलंगणात बीआरएसचे बारा वाजले. त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याचा विचार त्यांच्या मनात आला. काँग्रेसला जाता जाता त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. भाजप, बंडखोरी, बीआरएस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) असा त्यांचा प्रवास आहे.

चरण वाघमारे यांनी शरद पवारांच्या गटात जाण्याने भाजपचे नुकसान नाही. कारण तुमसरमध्ये आधीच अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. महायुतीमध्ये ती जागा अजित पवारांसाठीच सुटणार आहे. पण चरण वाघमारेंची शरद पवार गटातील एन्ट्री महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण चार ठिकाणी फिरून आलेल्या वाघमारेंना तिकीट देण्याला महाविकास आघाडीतील नेत्यांचा विरोध आहे.

NCP : साहेबांच्या राष्ट्रवादीतील प्रचार गिताचं लाँचिंग

काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) दोन्ही पक्षांतील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाघमारेंना उमेदवारी दिली तर आम्ही निवडणुकीत काम करणार नाही. राजीनामा देऊन मोकळे होऊ, असे त्यांनी म्हटले आहे. अशात स्थानिक विरोध झुगारून चरण वाघमारेंना शरद पवारांनी तिकीट दिले तर महाविकास आघाडीच्या विजयाच्या शक्यता निवडणुकीपूर्वीच मावळतील, असे म्हटले जात आहे. चरण वाघमारे यांना तिकीट दिले तर त्यांचे काम करण्यापेक्षा घरी बसणे पसंत करू, असा इशारा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

बावनकुळेंनी केली होती मध्यस्थी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चरण वाघमारेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. बावनकुळेंची मध्यस्थी यशस्वी होईल, असेही बोलले जात होते. पण बोलणी यशस्वी झाली नाही. वाघमारे यांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला. ते बीआरएसमध्येही रमले नाहीत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!