Akola constituency : काही दिवसांपासून जिल्ह्यात संमिश्र हवामान आहे. दिवसा 42 अंश सेल्सियस तापमान राहते आणि सायंकाळी पावसाळी वातावरण तयार होते. त्यामुळे ही स्थिती मतदारांना चटके लावणार की चिंब भिजवणार असा प्रश्न पडला आहे. तसेच शुक्रवारी होणारी मतदानाची टक्केवारी कितपत प्रभावित होईल ही चर्चा होत आहे.
मतदानावर परिणाम होणार का?
26 रोजी अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती मतदारसंघात मतदान होणार आहे. परंतु हवामान विभागाने या बहुतांश जिल्ह्यात वादळ, वा-यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार का, याविषयी चर्चा होते आहे.
कारण पूर्व विदर्भात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात झालेले मतदान सरासरी 56 टक्के झाले. काही ठिकाणी तर 50 टक्के देखील झालेले नाही. प्रशासन एकीकडे मतदान वाढावे यासाठी प्रयत्न करीत आहे. विविध उपाय योजले आहेत परंतु सतत बदलणारे हवामान अडथळा निर्माण करेल का अशी भीती व्यक्त होते आहे.
लोकसभा निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला आहे आणि 26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दुपारचे रणरणते उन पाहता सकाळी मतदान अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. उन्हाची तीव्रता पाहता. शेड, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी देखील सोय राहणार आहे.
हा तर ‘उन्साळा’
ना धड उन्हाळा ना पावसाळा. त्यामुळे सध्याच्या वातावरणाचा उल्लेख गमतीने उन्साळा असा होतो आहे. समाज माध्यमावर हा शब्द प्रयोग होताना दिसतो. हवामानाचा बदल अल्प काळाकरिता राहू शकतो परंतु सध्या सातत्य वाढलेले दिसते. काही दिवसांपासून हा बदल जाणवत आहे.
प्रशासनाचे आवाहन शुक्रवार, 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मतदारांनी उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.