महाराष्ट्र

BJP Politics : चंद्रशेखर बावनकुळे लागले कामाला !

Chandrashekhar Bawankule : आमदार झाल्यावर कोराडीत भरवला पहिला जनता दरबार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जातात. निवडून आलेले सर्व उमेदवार विविध चर्चांमध्ये, मुख्यमंत्री कोण होणार, विजयाचा जल्लोष यामध्ये अद्यापही गुंतलेले आहेत. अशात बावनकुळे यांनी कामाला सुरूवातही केली. आज (27 नोव्हेंबर) सकाळी त्यांनी कोराडी येथे निवडून आल्यानंतर पहिला जनता दरबार भरवला.

काल मतदारसंघात आणि जिल्हाभर जनता दरबाराचा मेसेज गेल्यानंतर आज सकाळपासूनच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात लोकांची रिघ लागली. अनेक जण समस्या, प्रश्न घेऊन येण्यापेक्षा आपल्या नेत्याचे अभिनंदन करण्यासाठी आलेले बघायला मिळाले. काही लोक प्रश्न, निवेदने घेऊनही आले होते. त्यांचे बावनकुळे यांनी नेहमीच्या स्टाईलने समाधान केले. शुभेच्छा देणाऱ्यांचे, अभिनंदन करणाऱ्यांचेही त्यांनी स्वागत केले.

लवकरच मुख्यमंत्री शपथ घेणार 

यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. सरकार स्थापनेला उशीर का होतोय, याचेही कारण त्यांनी सांगितले. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटतं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे. मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावे. पण यावर तिन्ही पक्षांचे नेते बसून निर्णय घेतील. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार, हे निश्चित.

गटनेता निवडीबाबत विचारले असता, गटनेता निवडीच्या बैठकीसाठी अजून तसा निरोप आलेला नाही. निरोप आल्यावर कळवू. तीन पक्षांचे सरकार बनवताना थोडा वेळ लागतोच. मंत्रिपद कसे वाटायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कुठे कोण असेल हे सर्व सूत्र तयार करून सरकार तयार होते. नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव निश्चित करणे एवढेच नसते. त्यामुळे काही काळ जाईल आणि लवकरच सरकार बसेल. शपथ नोव्हेंबरमध्ये होईल की डिसेंबरमध्ये, याचे काही पॅरामीटर नाहीत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.

मुख्यमंत्री भाजपचा असेल का, असे विचारले असता मला याबद्दल फारशी माहिती नाही. याबद्दलचे सर्व निर्णय आमचे केंद्रीय नेतृत्व आणि तीन पक्षांचे नेते बसून करतात. मी संघटनेचे काम पाहतो. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपसोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता. आमचे सरकार योग्य पद्धतीने बनत आहे. आमची काळजी करण्याची काहीही गरज नाही. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर आम्ही कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो. पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!