विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांची विधानं सध्या लक्ष वेधून घेत आहेत. कधी विरोधक तर कधी मित्र पक्षांकडे त्यांचा इशारा चर्चेचा विषय ठरत आहे. आज (बुधवार, दि.२४ जुलै) भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अश्याच एका विधानाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘आमच्याकडे जास्त आमदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आमच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार. अमित शहांनी हे आधीच स्पष्ट केले आहे,’ हे बावनकुळे यांचे विधान सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भातही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदाचाही वाद आमच्याकडे मुळीच नाही, असेही ते म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी 10 नेते तयार झाले आहेत. त्यामुळे राऊत यांनी महाविकास आघाडीतच जास्त लक्ष द्यावं. अंतर्गत वाद सोडविण्यासाठी जास्त वेळ द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र व राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना सर्वसामान्यांसाठी आणल्या आहेत. अर्थसंकल्पातही शेतकरी, महिला, युवा वर्गासाठी मोठी तरतूद आहे. अश्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद पाडण्यासारखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जो कल्याणकारी अर्थसंकल्प जनतेला दिला आहे, त्याला छेद देण्याचे काम होईल, असेही बावनकुळे म्हणाले.
संवाद थांबलेला नाही
आम्ही संवाद यात्रा पुढे ढकलली नाही. आमच्या विभागीय बैठका सुरू आहेत. संवाद बैठका सुरू आहेत. तालुका मंडळं काम करीत आहेत. नंतर संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचणार आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. संघाच्या बैठकीसंदर्भातही त्यांनी भूमिका मांडली. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमची नियमीत बैठक होत असते. समाजाच्या कल्याणाची कामे करण्यासाठी आमची बैठक झाली.’
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मजबुती
पंतप्रधान मोदी यांनी भारताला तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी काम सुरू केलं आहे. एनडीएचा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पहिला अर्थसंकल्प आज आला आहे. महिला, शेतकरी, शेतमजूर यांच्या कल्याणाचा हा अर्थसंकल्प आहे. विदर्भ व मराठवाड्यासाठीही यात भरगोस तरतूद आहे. मेट्रोपासून ते खेड्यापाड्यांमधील रस्त्यांपर्यंत या अर्थसंकल्पात तरतूदी आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्याचवेळी विरोध करणाऱ्यांनी गरिबांचे कल्याण केले नाही आणि मध्यमवर्गियांना करांमध्ये सवलत दिली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
मिटकरींनी बोलायला हवे होते
अमोल मिटकरी यांनी माझ्याशी किंवा अजित पवार यांच्याशी बोलायला हवे होते. ट्विट करण्याची गरज नव्हती. असे प्रश्न बोलून मार्गी लावता येतात, असेही बावनकुळे म्हणाले. त्याचवेळी गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यात निधीवरून झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. ‘एखादा मंत्री निधी मागत असेल आणि अजित पवार त्यांना काही सांगत असेल तर त्यात गैर काही नाही. मुळात जे घडलंच नाही त्याच्या बातम्या बाहेर येतात,’ असे ते म्हणाले.