Akola : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार’ असा उल्लेख केल्यानंतर दोन्ही बाजुंनी प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी तर शाहांच्या विधानाचा निषेध नोंदवलाच. पण अजित पवार गटाच्या आमदारांनीही यावर नाराजी व्यक्त केली. आज (शनिवार, दि. २७) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शाहांच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून त्यावर आणखी कडवी प्रतिक्रिया येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अकोला येथे भाजपची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला बावनकुळे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित शाह कुठलाही पुरावा किंवा माहिती असल्याशिवाय बोलत नाहीत, अशी प्रतिक्रिया देत पवारांवरील विधानाचं बावनकुळेंनी समर्थन केलं आहे.
‘आज देशाने अमित शाहांना स्वीकारल आहे. काँग्रेसच्या काळात शहांवर आरोप झाले. पण न्यायव्यवस्थेने त्यांना क्लीन चीट दिली. सत्तेपासून पैसा अशी काँग्रेस आणि शरद पवार यांची विचारधारा आहे. आयुष्यभर त्यांनी असेच राजकरण केले. त्यामुळे अमित शाह बोलले. ते माहिती असल्याशिवाय बोलत नाहीत. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवन्यासारखे आहे,’ अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे.
ते खोटारडे आहेत
यावेळी ‘पेन ड्राईव्ह’ प्रकरणावरही ते बोलले. ‘ते खोटारडे आहेत. त्यांनी गृहमंत्री असतानाच खुलासा करायला हवा होता. माझ्यावर दबाव होता हे आता सांगण्यात काय अर्थ. गृहमंत्री असताना दबाव टाकला जातोय म्हणून तुरुंगात टाकायचं होतं. हा त्यांचा खोटारडेपणा आहे, अशी बावनकुळे यांनी केली. त्याचवेळी हा त्यांचा बिझनेस सुरू असल्याचेही ते म्हणाले.
त्यांच्याकडे 14 मुख्यमंत्री
आज त्यांच्याकडे 14 मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरे पंधरावे आहेत. दरम्यान इंडिया आघाडीने खोटारडेपणा केलाय. आमचे खासदार निवडून आले तर साडेआठ हजार खटाखट खात्यात जमा करू, असे सांगितले. आज त्यांचे खासदार निवडून आले आहेत. आता बहिणी पैसे कधी येणार, याची वाट बघत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
खटाखटवाले पळालेत
महायुती सरकार जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून तात्काळ पैसे देतेय. पटापट वाले लवकर देत आहेत आणि खटाखटवाले पळाले आहेत. ते लोक जनतेला कन्फ्युज करतात. आम्ही विदर्भातील जनतेजवळ जाऊन कन्व्हिन्स करू. खोटारडेपणा जनतेने ओळखला आणि पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार आलंय, असेही ते म्हणाले.
डबल इंजीन?
मोदी सरकारचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर डबल इंजन सरकार द्या, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. ‘डबल इंजिन’चा उल्लेख केल्यामुळे त्यांना शिंदे गट अपेक्षित आहे की अजित पवार गट अपेक्षित आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.