महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर रविवारी (ता. 14) आरोप केला होता. लगेच सोमवारी (ता. 15) ते पवार यांना भेटायला सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी गेले. यावरून महायुतीमध्ये ते नाराज असल्याची चर्चा आहे. पण छगन भुजबळ वेगळा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आहे.
नागपुरात सोमवारी (ता. १५) पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, भुजबळ जर शरद पवारांना भेटायला गेले. तर याचा अर्थ राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यासंदर्भात सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी ते गेले असतील. कारण राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची अजिबात गरज नाही.
छगन भुजबळ यांची वाटचाल सर्वांना माहिती आहे. महायुतीमधील ते महत्वाचे घटक आहेत. महायुती डॅमेज होईल, असा कुठलाही निर्णय ते घेणार नाहीत. महायुतीत एकजुट कशी राहिल, याच्यासाठीच भुजबळ प्रयत्नरत असतात. वरिष्ठांचं मार्गदर्शन राज्याचा कारभार करताना घ्यावं लागतं. राज्यातील 14 कोटी जनतेच्या हिताचं रक्षण महायुती करते आहे. छगन भुजबळ महायुतीमधील दुवा म्हणून काम करतील, असाही विश्वास आमदार बावनकुळे यांनी व्यक्त केला.
Eknath Shinde : वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा
संवाद यात्रेसाठी बैठक
21 जुलैला भारतीय जनता पक्षाच्या 5 हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन पुणे येथे होत आहे. या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, सर्व केंद्रीय मंत्री, केंद्रीय पदाधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व असणार आहोत. तेथे संवाद यात्रेची रुपरेषा जाहीर केली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील 19 नेते महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 मतदारसंघात यात्रा काढणार आहेत.
जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रांत ही यात्रा फिरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने जे बजेट दिले आहे. त्यामधील ‘लाडकी बहीण’. तीन सिलिंडर आदी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे. जेणेकरून समाजाला त्याचा लाभ झाला पाहिजे, असा या यात्रेचा उद्देश असणार आहे.