BJP & Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज ( ता.3) घटस्थापनेच्या निमित्ताने कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात एकाचवेळी पोहोचले. ‘आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलोय’, अशी प्रतिक्रिया दोघांनी दिली. लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या यशासाठी आशीर्वाद मागितले. नवरात्रीला जगदंब मंदिरात भक्तगण मोठ्या श्रद्धेने येतात. त्याचबरोबर राजकीय पक्षांचीही हजेरी असतेच. आज नाना पटोले आणि बावनकुळे सोबतच आले. त्यामुळे मैत्रीपूर्ण वातावरण होते.
मुलींचं रक्षण कर
नवरात्री उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. महिलांचा मान करणे त्यांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचा घटना वाढत आहेत. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा घटनाही वाढत आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. बदलापुरात घटने नंतर आता पुण्यातही तसेच कृत्य घडले आहे. म्हणून आज महिला, मुलींच्या सुरक्षेचा आशीर्वाद देवीला मागितला, असे नाना पटोले म्हणाले.
शेतकऱ्यांवर अत्याचार
अन्नदाता शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे. परंतु राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या तिजोऱ्या नेहमी खुल्या पाहिजे. परंतु असे होत नाही. उद्योगपत्यांसाठी तिजोरी उघडी आहे. हा शेतकरी मित्रांवर अन्याय असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. म्हणून शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध ठेवण्याची प्रार्थना देवीकडे केली, असेही नाना पटोले म्हणाले.
आम्हीच जिंकणार
लोकसभेप्रमाणे आम्ही विधानसभाही अतिशय चांगल्या प्रकारे जिंकू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.
राजकीय पक्ष म्हणून नाही तर..
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘कोराडीच्या आईचा जन्म नाना पटोले यांच्या गावचा असल्याची आख्यायिका आहे. देवीकडे महाराष्ट्रात समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना केल्याचे ते म्हणाले. कुठलीही राजकीय कटुता आज नाही,’ असेही त्यांनी सांगितले. ‘आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलेलो नाही. तर आईची मुलं म्हणून एकत्र आलोय,’ असंही ते म्हणाले. आम्ही आईकडे विजयाचा आशिर्वाद मागितला. माझ्या नातीचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम आम्ही इथेच केल्याचे पटोले म्हणाले. आम्ही दोघे भाऊ आहोत, भावांसाठी आशीर्वाद मागितला असल्याचे बावनकुळे म्हणाले.