प्रशासन

Chandrapur : बिल्डरांवर कारवाई; राजकीय टेंशन वाढले?

Builder : चंद्रपूर शहरातील 28 बिल्डरांवर गुन्हा दाखल

Chandrapur  : चंद्रपूर महानगरपालिकेने शहरातील 28 बिल्डरांवर गुन्हा दाखल केला आहे. अवैध प्लॉट विक्री करणाऱ्या बिल्डरांना चांगलाच दणका बसलेला आहे. मात्र त्याचवेळी या कारवाईमुळे चंद्रपुरातील राजकीय टेंशन वाढलं आहे. कुणाच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

खळबळ माजली

सर्वाधिक 23 बिल्डरांवर एकाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनअंतर्गत ही कारवाई झाली. तर पाच बिल्डरांवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे चंद्रपूर शहरात एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये आता राजकीय वरदहस्त लाभलेले बिल्डर नेमकी काय भूमिका घेतात? त्यांचे पाठीराखे असलेले राजकीय पक्ष काय भूमिका घेतात? आणि ज्यांची प्लॉट खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक झालेले सामान्य नागरिक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

इरई नदीच्या काठावर वडगाव, गोविंदपूर विभागातील ब्लू लाईनमधील सात ठिकाण आरक्षित ठिकाणांवर बेकायदेशीर व्यवहार झाले. या व्यतिरिक्त महाकाली मंदिराजवळील ऐतिहासिक बैल बाजारासाठी आरक्षित जागेत देखील हाच प्रकार घडला. या दोन्ही ठिकाणी बेकायदेशीर ले-आऊट आणि प्लॉटची विक्री केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सहायक नगर रचनाकार सारिका शिरभाते यांनी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 53अ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात 23 भूखंडधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 5 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात वरील कायद्याच्या कलम 52 व 53 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक चौधरी, राहुल बोटवार, नानाजी इटनकर, पूनम इटनकर, योगित रघटाटे, राजेंद्र रघताटे, विकास घाटे, सरिता घाटे, नंदलाल बियाणी, मधुकर मानेकर, भरत वाघाडे, स्वाती तातावार, संजय लेखवाणी, रवी चमनानी, मोहन ठाकरे, अतुल रायपुरे, बंडू नगरकर, रफिक सत्तार शेख, व्यंकट स्वामी पंगा, उत्तम कृष्णा वाघमारे, कृष्णा वाघमारे, डॉ. रवा, मंजू कश्यप यांच्यावर रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात युवराज वनकर, प्रशांत वनकर, इंदू वनकर, प्रभाकर वनकर, किशोर वनकर यांच्यावर कारवाई झाली.

चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर बांधायचे आहे. परंतु त्या मानाने शहरांमध्ये जागेची कमतरता भासत आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत शहरातील काही बिल्डर लोकांची फसवणूक करत आहेत, असे उघडकीस आले आहे.

असे झालेत गुन्हे दाखल

स्थानिक रामनगर पोलिस ठाण्यात २३ प्लॉटधारकांविरुद्ध MRTP 1966 च्या कलम 53A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 5 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम 52 आणि 53 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kishore Jorgewar : शहराच्या स्वच्छतेसाठी आमदार सरसावले

आयुक्तांची भूमिका

‘द लोकहित’ने चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन पालीवाल यांच्याशी संपर्क साधला. नागरिकांनी या भागातील अशा प्रकारचे प्लॉट खरेदी करू नये. ज्यांनी प्लॉट खरेदी केले असतील त्यांनी त्या ठिकाणी नवीन बांधकाम करू नये. आणि कोणीही केवळ नोटरीवर प्लॉटची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!