महाराष्ट्र

Chandrapur : मंत्रिपदाविना चंद्रपूर जिल्हा झाला पोरका!

Mahayuti : सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश नसल्याने जिल्हावासियांची निराशा

Sudhir Mungantiwar : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता सुरुवात झाली आहे. 33 वर्षानंतर नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाकडे. 30 वर्ष सलग आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मंत्री पदाला पोरका झाल्याचा संताप जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.

राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले ‘सरप्लस’ बजेट महाराष्ट्राला दिले. याशिवाय 50 कोटी वृक्षारोपण करीत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालटच सुधीर मुनगंटीवार यांनी करून टाकला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली होती.

हा तर अन्याय आहे

महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा आवर्जून समावेश असेल, असे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटत होते. त्यामुळे सलग सात टर्म विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार यांना काय मिळणार? याची उत्सुकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होती. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्यामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत, हे विशेष.

मंत्रिपद मिळणे होते गरजेचे

2019 मधील विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजारांवर मतं मिळाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी 33 हजार 440 मतांनी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेली आघाडी मोठी आहे. 25 हजार 985 मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या आघाडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपमधील त्यांची ज्येष्ठता आणि जनसंपर्क पाहता त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळणे गरजेचे होते. मात्र असे न झाल्याने चंद्रपूर जिल्हातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत.

Maharashtra Cabinet : देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाड्याचा डंका 

जिल्ह्याच्या प्रगतीत मुनगंटीवारांचे योगदान

सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचं रोपटं आता वटवृक्ष झालं आहे. भारतीय जनता पार्टीला चंद्रपूरमध्ये अभेद्य किल्ला बांधण्यामध्ये मुनगंटीवार यांचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे देखील चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भाजपकडून मोठी अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. भारतीय जनता पार्टी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!