महाराष्ट्र

Lok Sabha Election : चंद्रपुरातील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची तक्रार

Chandrapur Constituency : भाजपची सायबर सेलमध्ये धाव

BJP Vs Congress : पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अशात महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आली आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. यासंदर्भात आता चंद्रपूर भाजपने सायबर सेलमध्ये धाव घेतली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अलीकडेच चंद्रपुरात झाली. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आणीबाणीवर टीका केली. त्यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओशी छेडछाड करीत अर्धवट व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. काँग्रेसजवळ विकासाबाबत बोलण्यासाठी काहीच नसल्याने त्यांनी हा खोडसाळपणा केल्याचा आरोप चंद्रपूर भाजपने केला होता. यासंदर्भात चंद्रपूरचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी काँग्रेसवर टीका केली होती. आता हे प्रकरण सायबर सेलकडे जाणार आहे.

निवडणुकीच्या काळात प्रचार करण्यासाठी व एकमेकांवर टीका करण्यासाठी डिजिटल साहित्याचा वापर केला जात आहे. अशात हाती येणाऱ्या व्हिडीओशी छेडछाड करीत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. असाच प्रकार सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीत झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या चंद्रपुरात राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांची यादी भाजपकडून सादर करण्यात येत आहे. तर काँग्रेसकडून भावनिक आधारावर प्रचार केला जात आहे.

अलीकडेच चंद्रपुरात नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेमुळे या मतदारसंघातील समीकरण पूर्णपणे बदलले आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार येणार असेल तर विरोधी पक्षातील उमेदवार का निवडून द्यायचा, या मतावर आता चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील मतदार पोहोचले आहेत. देशभरात भाजपची सत्ता असताना एकट्या चंद्रपुरातून गेल्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला कौल दिला होता. परंतु त्याचा काय फायदा झाला, अशी चर्चा या मतदारसंघात जोरात आहे. आमदार आणि त्यानंतर मंत्री झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांचा हिशोब मतदार घेत आहेत. त्यामुळे भाजपचे पारडे दिवसेंदिवस जड होत आहे.

सुधीर मुनगंटीवार हे राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वीच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. महाराष्ट्रातील राजकारणा मुनगंटीवार हे सगळ्यात ज्येष्ठ असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे ते खासदार झाल्यास मुंबई आणि दिल्लीच्या तिजोरीतून निश्चितच चंद्रपूरला मोठा निधी मिळेल असा निष्कर्शावर आता मतदार आल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसने चालविलेल्या अपप्रचाराविरुद्ध आता कायदेशीर लढा देण्याचा निर्णय भाजपने चालविला आहे. असे झाल्यास चुकीचा व्हिडीओ सगळ्यात प्रथम कुठुन व्हायरल झाला, याच्या मुळापर्यंत कदाचित तपास यंत्रणेला पोहोचता येणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!