Lok Sabha Election : मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. मराठवाड्यात आठच्या आठ तर राज्यात 32 जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत असा आमचा रिपोर्ट आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे, जालन्यात रावसाहेब दानवे हे हारणार, मुख्यमंत्री शिंदे आता संपले आहेत. असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. कोणता पक्ष सत्तेत येणार हे त्याच दिवशी दुपारपर्यंत स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. बहुतांश उमेदवारांनी तर आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.
विजयाचे दावे प्रतिदावे
निवडणुकीच्या निकालाला मोजके दिवस बाकी आहेत. परंतु दावे प्रतिदावे केले जात आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी नगरातून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मात्र, वेगळाच दावा केला आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मीडियाशी संवाद साधताना 31 मे शुक्रवारी ते बोलत होते.
Gas Pipeline Issue : शेतकरी कुटुंबाने मागितली आत्मदहनाची परवानगी
खैरे म्हणाले, मागील निवडणुकीत रावसाहेब दानवेंनीच मला पाडलं. त्यामुळे परमेश्वर बदला घेतो. राज्यात महाविकास आघाडीला 32 जागा मिळतील. अनेकांनी हा अंदाज वर्तवला आहे. महायुतीला 8 ते 10 जागा मिळतील. अपक्ष वगैरे कोणी येणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत आहे. एकनाथ शिंदे संपले. सगळे खोके घेऊन गेलेत. लोकांना त्यांच्याबद्दल राग आहे. उद्धव ठाकरेंना सोडून दिले. ज्याने मोठे केले त्यांच्या विरोधात जातात. त्यामुळे लोकं विरोधात आहेत असे खैरे म्हणाले.
भुमरेंनी ईव्हीएम मशीन बदलल्या काय ?
मी एक ते दीड लाखांचं मताधिक्य घेऊन विजयी होणार आहे, असा दावा संदीपान भुमरे यांनी केला आहे. भुमरे यांच्या या दाव्यावरही खैरे यांनी टीका केली. भुमरेंनी ईव्हीएम मशीन बदलल्या आहेत काय ? एक लाखाचं मताधिक्य घेऊन निवडून येणं कसं शक्य आहे? असा सवाल खैरेंनी केला. यावेळी हिंदू मते तर मिळणारच आहे. पण 22 टक्के मुस्लिम मतेही मला मिळणार आहे, असा आणखी एक दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.