महाराष्ट्र

UPSC Scam : पूजा खेडकरच्या तपासात मोठ्या बनवेगिरीचे संकेत

Delhi High Court : ऑक्टोबरमध्ये होणार पुढील सुनावणी

Puja Khedkar Case : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात बनवेगिरी झाल्याचा संशय तपास करणाऱ्या पोलिसांना आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आपले म्हणणे दाखल केले आहे. पोलिसांनी बाजू ऐकल्यानंतर आता न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी 4 ऑक्टोबरला ठेवली आहे. त्यामुळे तूर्तास पुजाला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाशी संबंधित वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. तोपर्यंत पूजाला अटकेपासून मिळालेले अभयही कायम राहणार आहे. यूपीएससीने बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी पूजावर कारवाईची मागणी केली आहे.

पुजाने एम्समध्ये आपल्या अपंगत्वाची तपासणी करण्याची तयारी दाखविली होती. ही सुनावणी 5 सप्टेंबरला झाली होती. अशातच दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात यासंबंधी एक नवीन स्टेटस रिपोर्ट दाखल केला होता. त्यात पूजा यानी यूपीएससीला सादर केलेल्या 2 अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी 1 बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी यासंदर्भात दहा दिवसांचा वेळ दिला आहे. 19 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने यूपीएससीने दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली. त्यावर पुजाला उत्तर सादर करायचे आहे. पोलिसांनी यूपीएससीने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी वेळ मागितला.

प्रमाणपत्रावर संशय

नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 मध्ये पूजा खेडकरने दोन अपंगत्व प्रमाणपत्रे (एकाधिक अपंगत्व) सादर केले. पुजाला हे प्रमाणपत्र महाराष्ट्रातील अहमदनगर वैद्यकीय प्राधिकरणाने दिले आहे. अहमदनगर वैद्यकीय प्राधिकरणाकडून तपासण्यात आलेले हे दोन्ही प्रमाणपत्र पोलिसांना मिळाले. त्यानुसार अहमदनरगरच्या प्राधिकरणाने यासंदर्भात आपले म्हणणे कळविले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक (Civil Surgeon) कार्यालयातील नोंदीनुसार, या प्राधिकरणाने अपंगत्व प्रमाणपत्र (एकाधिक अपंगत्व) क्रमांक MH2610119900342407 पुजाच्या नावाने दिलेले नाही. त्यामुळे हे अपंगत्व प्रमाणपत्र फसवणूक असण्याची शक्यता आहे.

Pooja Khedkar. : ‘सरकारने मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही’

अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास उमेदवाराला कमाल मयात 10 वर्षांची सूट मिळते. प्रत्येक पेपरसाठी एक तासाचा जास्तीचा वेळ मिळतो. वयोमर्यादा संपेपर्यंत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देता येते. परीक्षा केंद्र अपंग उमेदवाराच्या वर्तमान पत्त्याजवळच ठेवले जाते. दृष्टिबाधित असल्यास उमेदवाराला पेपर लिहिण्यासाठी लेखक (Writer) दिला जातो. दिव्यांगांची मेरीट लिस्ट इतर उमेदवारांपेक्षा वेगळी लागते. पुजाचे प्रमाणपत्रही याच प्रवर्गातील आहे.

पुजाचा आरोप

पूजा खेडकरची निवड संघ लोकसेवा आयोगाने 31 जुलै 2024 रोजी रद्द केली. तिला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे पुजाला भविष्यात कोणतीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही. पुजाने 28 ऑगस्टला यासंदर्भात उच्च न्यायालयात युक्तीवाद केला. यूपीएससीला तिच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. 2019, 2021 आणि 2022 मधील व्यक्तिमत्व चाचण्यांदरम्यान गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे (डोके आणि बोटांचे ठसे) आपली ओळख सत्यापित (Verify) केली आहे, असे पुजाने कोर्टाला सांगितले. त्यामुळे कोर्टाने अटकेपासून वाचविणारा अंतरिम जामीन मंजूर केला.

सामान्य श्रेणीतून उमेदवारांना युपीएससी परीक्षेसाठी सहा वेळा प्रयत्न करता येतात. अपंग प्रवर्गासाठी ही मर्यादा नऊ आहे. जावर खोटे वय, आडनाव बदलणे, पालकांची चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. आरक्षणाचा चुकीचा फायदा घेतल्याचा ठपका आहे. याशिवाय नागरी सेवा परीक्षा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा दिल्याचा आरोप आहे. एक एक करीत पुजाला सर्व आरोप कोर्टात खोडून काढायचे आहेत.

पुजाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण 47 टक्के अपंग असल्याचे तिचे म्हणणे आहे. डाव्या गुडघ्यात अस्थिरता असल्याचे पुजाचे म्हणणे आहे. याशिवाय तिचे काही अस्थि भंगलेले (Anterior Cruciate Ligament) आहेत. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आपण 12 वेळा प्रयत्न केले. त्यापैकी सात प्रयत्न सर्वसाधारण प्रवर्गातून होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पुजाचा आहे.

पत्त्यात तफावत

पुजाने जे अपंग प्रमाणपत्र सादर केले त्यात तफावत आहे. पुजाने आपला पत्ता अपंग प्रमाणपत्रावर प्लॉट नं. 53, देहू आळंदी रोड, तळवडे, पिंपरी चिंचवड, पुणे असा लिहिला होता. त्या पत्त्यावर थर्मोव्हर्टा इंजिनिअरिंग कंपनी नावाचा कारखाना आहे. पुजाने पुण्यात असताना एका खासगी ऑडी कारवर अंबर दिवे लावले होते. ही कार जप्त करण्यात आली आहे. ही कार याच कंपनीच्या मालकीची आहे. सरकारी नियमानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. मात्र पूजाच्या प्रमाणपत्रात रेशनकार्डचा समावेश होता, असे पोलिसांच्या तपासात आढळले आहे.

पुजाची अनेक अपंगत्व प्रमाणपत्रे बाहेर आली आहेत. ही प्रमाणपत्रे पोलिसांना सापडल्याचा दावा आहे. पूजा खेडकर यांनी 2018 आणि 2021 मध्ये अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलने आयोगाकडे दिलेले दोन अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होते. पूजाने तिच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची पुष्टी करण्यासाठी एका खासगी रुग्णालयात केलेला अहवाल यूपीएससीकडे सादर केला. पूजा खेडकरचे लोकोमीटर प्रमाणपत्र तयार करताना कोणतीही चूक झाली नसल्याचे यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयाने (YCMH) स्पष्ट केले आहे. हे रुग्णालय पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालवले जाते.

पुजाने यूपीएससीला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला होता की, ती मानसिकदृष्ट्या अक्षम आहे. तिला दिसण्याचाही त्रास आहे. यासाठी वैद्यकीय चाचणी देणे आवश्यक होते. असे असतानाही पुजाने सहा वेळा वैद्यकीय चाचणी देण्यास नकार दिला होता. एप्रिल 2022 मध्ये दिल्ली एम्समध्ये होणार होती. पण तिने कोविड पॉझिटिव्ह असल्याचे कारण देत यात सहभागी होण्यास नकार दिला होता, असाही आरोप आहे.

आयोगाने कारवाई केल्यानंतर पुजाने युपीएससीला सेवेतून काढण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. तिच्या दाव्यानुसार सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागच ही कारवाई करू शकतो. यावर आयोगाने सांगितले की, पुजाला 18 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) देण्यात आली होती. त्यात पुजाला 25 जुलैपर्यंत उत्तर द्यायचे होते. तिने तिच्या जबाबासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे कारण दिले. त्यासाठी 4 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला. आयोगाने सांगितले की, पुजाला 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजेपर्यंत वेळ दिला होता. परंतु पुजाने प्रतिसाद दिला नाही.

बरीच अदलाबदल

आयोगाने कोर्टाला सांगितले की, पुजामुळे आयोगाने 15 हजार उमेदवारांचा डाटा तपासला. त्यात पुजाच्या तपशिलात घोळ सापडला. त्यात पुजा नावच नाही, तर पालकांची नावे देखील अनेक वेळा बदलून परीक्षेला बसल्याचे आढळले. त्यामुळे युपीएससीची मानक कार्यप्रणाली (SOP) प्रयत्नांची संख्या ट्रॅक करू शकली नाही. यात आयोग आता दुरूस्ती करीत आहे. जेणेकरून भविष्यात अशा प्रकरणांची पुनरावृत्ती होणार नाही.

पुण्यातून वाद

पुण्याची पूजा खेडकर 2023 मधील तुकडीची आयएएस अधिकारी आहे. संघ लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये घेतलेल्या परीक्षेत पुजाचा क्रमांक 841 होता. त्यानंतर जून 2024 पासून पूजा पुण्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून रूजू झाली. गैरवर्तनामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुजाविरुद्ध राज्य सरकारला अहवाल पाठविला होता. त्यानंतर पुजाची बदली विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्यात करण्यात आली. पुजाने वाशिममध्ये सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.

error: Content is protected !!