Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठीचे जागा वाटप हे महायुतीत कुठलाही वाद न होता शांततेत व सन्मानाने होईल. पक्ष नेतृत्वाची बैठक येत्या एक ते दोन दिवसांत होईल. कोण किती जागा लढवतंय यापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहूनच जागा वाटप होईल. स्ट्राइक रेट चांगला राहिल अशाच पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे वक्तव्य शिंदेसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे दोन दिवस जिल्हा बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे आयुष्यमान संवाद कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. भाजप 160 जागा मागत आहे. मित्रपक्षांची फक्त 128 जागांवर बोळवण केली जात आहे, अशी चर्चा असल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. यावे त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले. ही केवळ चर्चा आहे. महायुतीत शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार आहेत, असे ते म्हणाले.
एकत्र लढा देणार
महायुती एकसंघपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल. आपण काही मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे नाही. पक्ष नेतृत्वाच्या बैठकीत एक-दोन दिवसांत निर्णय होतील, पितृपक्षानंतर यावर खऱ्या अर्थाने निर्णय होईल, असे ते म्हणाले. कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडून येऊ शकतो? तेथील जुना इतिहास व कामगिरी काय? या सर्व बाबी तपासल्या जातील. सरकार आल्यानंतर केलेल्या कामाचा अहवाल पीएमओला सादर करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर 100 दिवसांच्या कामकाजाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुषंगाने अहवाल सादर करण्यात आला आहे, असे प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात 100 दिवसांत आयुष मंत्रालयाने महत्त्वाचे निर्णय घेतले. नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिली. देशात 10 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू होत आहेत, असेही ते म्हणाले. आयुर्वेदिक औषध सहज उपलब्ध होत नाही. त्यासाठी आता तालुकास्तरावर आयुष औषध केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात अमृत स्टोअर सुरू करत असल्याचे तजाधव म्हणाले.
उंबरठे झिजवत नाही
प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री पदावर बोलतांना सांगितले की, मुख्यमंत्री कोण होईल हे नाव सांगायला इतका मी मोठा नाही. आमचे सगळेच पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री ठरवताना वाद होणार नाही. आमच्या पक्षात कोणी दिल्लीला जाऊन मला मुख्यमंत्री करा म्हणून उंबरठे झिजवत नाही. बाळासाहेबांनी कधीही यासाठी मातोश्री सोडली नाही. सगळे पक्षाचे नेते बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर येत होते.
पण आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मला मुख्यमंत्री करा म्हणून छोट्या छोट्या पक्षाचे नेत्यांकडे जाऊन लोटांगण घालत आहेत, अशी टीका ही त्यांनी केली.