Baramati Constituency राज्यात लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना बारामतीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले होते. मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. गेल्या 45 मिनिटांपासून हे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी हा आरोप केला आहे.
नेमके काय कारण आहे?
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या गोडाउनमधील सीसीटीव्ही बंद पडल्याचे दिसून आले. कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून प्रशासनाचे गोदामावर लक्ष आहे. मात्र, रविवारी सीसीटीव्ही फुटेज बंद पडल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10.25 वाजल्यापासून बंद आहे. यामागे नेमके काय कारण आहे? मी यासाठी त्या विभागाच्या आरओला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही.
तिकडे टेक्निशियन्स नाहीत. आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिले जात नाही. हे सगळे काय चाललंय, असा प्रश्न लक्ष्मीकांत खाबिया यांनी विचारला. सीसीटीव्ही फुटेज बंद असताना काहीतरी होण्याची शक्यता तर नाही ना, पोलिस म्हणतात आम्हाला काही सूचना मिळालेल्या नाहीत. काय चाललंय काय हे? असा सवाल लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे.
45 मिनिटानंतर पुन्हा सुरू
दरम्यान, इलेक्ट्रिक कामासाठी केबल काढल्यामुळे सीसीटीव्ही बंद असल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे. 45 मिनिटा नंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यात आले.