कितीही महत्वकांक्षी योजना सरकारने आणल्या तरीही त्यांच्या अंमलबजावणीवर यश-अपयश अवलंबून असते. भंडाऱ्यात अश्याच एका योजनेचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश उपलब्ध करून देण्याचे ठरविले. याअंतर्गत पंचायत समितीमार्फत प्रत्येक शाळांना कापड देण्याचे ठरले. कापडाचे ट्रक पंचायत समितीला येऊन थांबले. मात्र, त्याचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे या योजनेचा फज्जा उडणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकंदरीत प्रति विद्यार्थी शिलाईमागे 110 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे कुठलाही टेलर या तोकड्या निधीत शिलाई करून देण्यास तयार नाहीत. परिणामी, गणवेशाच्या शिलाईसाठी एवढा कमी निधी का दिला जात आहे, हे न समजणारे कोडे आहे.
शाळा सत्र सुरू होऊन तीन आठवड्यांचा कालावधी झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही पंचायत समितीमार्फत शासनाकडून आलेल्या कापडांचे शाळांना पूर्णतः वाटप झालेले नाही. विद्यार्थ्यांच्या वयानुसार कपड्यांचे वाटप केले जाणार आहे. त्या हिशेबाने टेलरकडून कपडे शिवून घ्यायचे आहेत. मात्र, कापडांचे वाटप अजून झालेले नाही. त्यातही 110 रुपये प्रति विद्यार्थी एका ड्रेस मागे मिळणार आहेत. दोन ड्रेस शिवून देण्यासाठी 220 रुपये मिळणार आहेत. एकंदरीत कापडाचेच वाटप न झाल्याने गणवेश कधी शिवला जाणार, हा प्रश्नच आहे.
रेडिमेडचा पर्याय होता तरीही
आधुनिक युगात रेडिमेड गणवेश उपलब्ध असण्याचे ऑप्शन असतानाही राज्य शासनाने गणवेशासाठी कापड देऊ केले आहे. तसेच शिलाईसाठी 110 रुपये देऊन ते काम करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे स्काऊट गाइडचा पॅटर्नचा ड्रेस 110 रुपयांत कोणी शिवायला तयार नाहीत.
300 वरून थेट 110
राज्य शासन यापूर्वी प्रति विद्यार्थी गणवेशामागे 300 रुपये देत होते. दोन जोड गणवेशासाठी 600 रुपये मिळायचे. आता शिलाईसाठी फक्त 110 रुपये शासनाने देऊ केले आहे. त्यातही कापडाचे वाटप झालेले नाही. मुख्याध्यापकांना याच कामात जुंपून ठेवायचे काय? असा प्रश्नही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष मुबारकअली सय्यद यांनी केला आहे.
सूचनेनुसार वाटप होईल
गणवेश शिलाईसाठी शासनाकडून कापड उपलब्ध झाले आहे. मात्र, वाटपासंदर्भात दिशा- निर्देश प्राप्त नसल्याने ते शाळांना देण्यात आले नाहीत. सूचनेनुसार वाटप करण्यात येईल, वक्तव्य भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वर्षा बेले यांनी ‘द लोकहित’शी बोलताना सांगितले.